Sunday, May 11, 2025

पालघर

अपघात प्रणव क्षेत्राचे फलक आता मुंबई-अहमदाबाद महामार्गावर!

अपघात प्रणव क्षेत्राचे फलक आता मुंबई-अहमदाबाद महामार्गावर!

पालघर (वार्ताहर) : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुर्घटना सातत्याने होत असतात. अनेक जणांचा बळी जातो, तर काही गंभीर जखमी होतात. त्यामुळे अपघातांना रोखण्यासाठी वसई-विरार, मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाने पावले उचलली आहेत. त्यानुसार अपघात प्रवण क्षेत्र म्हणजेच ब्लॅक स्पॉटची ठळकपणे माहिती दर्शविणारे फलक लावण्यात आले असून वाहनचालकांना सतर्क करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.


वसई, विरार, वरसावे पूल, तसेच विरार भाग हा राष्ट्रीय महामार्गाशी जोडला गेला आहे. गुजरात ते मुंबई दरम्यान ये-जा करणारी अवजड व हलकी वाहने धावत असतात अशा वेळी नियमांना बगल दिल्याने अपघातांत वाढ झाली आहे. एकाच परिसरात अनेक अपघात झाल्यामुळे अशी ठिकाणे धोकादायक बनत आहेत. त्यामुळे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी ज्या ठिकाणी तीन वर्षांत पाच किंवा त्याहून अधिक प्राणांतिक अपघात घडले आहेत, अशा ठिकाणांची पाहणी वाहतूक पोलिसांच्या सोबत केली. तसेच या ठिकाणी वाहनचालकांना सतर्क करणारे फलक लावण्यात आले आहेत.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वसई-विरार महामार्गावरील सर्वाधिक अपघात हे वसईच्या कामण चिंचोटी येथे झाले आहेत. या भागात ४७ अपघात झाले आहेत, तर दिल्ली दरबार हॉटेल व किनारा ढाबा याठिकाणी प्रत्येकी २९ दुर्घटना घडल्या आहेत. एचपी पेट्रोल पंप येथे २५ व नायगाव बापाने पुलाजवळ २३ अपघात घडले आहेत.


महामार्ग प्राधिकरण लक्ष कधी देणार?


एकीकडे अपघातांना आळा बसावा म्हणून पोलीस आयुक्तालयाने जनजागृती व ब्लॅक स्पॉटबाबत सूचना जाहीर केल्या असून त्यासाठी १६ ठिकाणी फलक लावले. याचे स्वागत वाहनचालकांनी केले असले तरी महामार्गाच्या अनेक समस्या, रस्त्यांची दुरवस्था, त्यामुळे होणाऱ्या अपघातांकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग, देखभाल-दुरुस्ती विभाग केव्हा लक्ष घालणार, असा सवाल सुज्ञ नागरिकांतून केला जात आहे.

Comments
Add Comment