Monday, July 15, 2024
Homeमहत्वाची बातमीदेशात लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज - मोहन भागवत

देशात लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज – मोहन भागवत

नागपूर : देशात लोकसंख्येचे योग्य संतुलन आवश्यक आहे. यासाठी देशात लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज आहे. आपल्या देशाचे पर्यावरण किती लोकांचे पालनपोषण करु शकते, किती लोकांना ते सांभाळू शकते, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. हा केवळ देशाचा प्रश्न नाही. जन्म देणाऱ्या आईचाही प्रश्न आहे. त्यामुळे लोकसंख्येचे सर्वसमावेशक धोरण असावे आणि ते सर्वांनाच लागू व्हावे. त्या धोरणातून कोणालाही सवलत देता कामा नये, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. नागपुरात ते दसरा मेळाव्याला संबोधित करताना बोलत होते.

आरएसएस प्रमुख मोहन भागवत विजयादशमीच्या सभेत म्हणाले, एखाद्या देशात जेव्हा लोकसंख्येचा असमतोल निर्माण होतो, तेव्हा त्या देशाच्या भौगोलिक सीमाही बदलतात. एका भूभागातील लोकसंख्येचा समतोल बिघडल्यानेच इंडोनेशियापासून पूर्व तिमोर, सुदान ते दक्षिण सुदान आणि सर्बिया ते कोसोवा असे नवे देश निर्माण झाले. लोकसंख्या नियंत्रणाबरोबरच पंथावर आधारित लोकसंख्येचा समतोल राखणे हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे मोहन भागवत म्हणाले.

सत्ता हाच प्रत्येक गोष्टीचा आधार आहे. शक्ती हा शांती आणि शुभचा आधार आहे. चांगलं काम करण्यासाठी शक्ती लागते, असे ते म्हणाले.

महिलांना घरात बंद ठेवणे योग्य नाही. मातृशक्तीला सशक्त बनवण्याची आवश्यकता आहे. महिलांच्या सहभागाशिवाय कोणतीही संघटना उभी केली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट मत भागवत यांनी व्यक्त केले.

भागवत पुढे म्हणाले, मातृशक्तीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. आपण महिलांना जगाची माता मानतो, पण त्यांना पूजाघर किंवा घरांत कोंडून ठेवले आहे. परकीय हल्ले संपल्यानंतरही त्यांना निर्बंधातून स्वातंत्र्य मिळालेले नाही. स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त काम करू शकतात. मातृशक्ती जागृत करण्याचे काम आपल्या कुटुंबापासून समाजापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.

आज आत्मनिर्भर भारताची प्रतिमा उभी राहात आहे. भारताचे म्हणणे जग आता ऐकत आहे. जगात आपली पत आणि प्रतिष्ठा वाढली आहे. श्रीलंकेच्या संकटात आम्ही खूप मदत केली. युक्रेन-रशिया युध्दादरम्यान आमची भूमिका मोठी होती. यामुळे आम्हाला अभिमान वाटतोय. क्रीडा क्षेत्रातील धोरणांमध्येही चांगली सुधारणा झाली आहे. आमचे खेळाडू ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमध्ये पदकं जिंकत आहेत. कोरोनानंतर देशाची अर्थव्यवस्थाही सुधारत आहे. काळानुसार सगळं काही बदलत आहे. आपल्या देशात कलह, अराजकता, दहशतवाद वाढत आहे. त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.

नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात विजयादशमीचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली महिला संतोष यादव या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. आरएसएसच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -