शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली. विचारांचे सोने लुटायला या, असे आवाहन बाळासाहेब करत असत आणि मुंबई-ठाण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यांतील शिवसैनिक गुलाल उधळत येत असत. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर ज्यांच्याकडे पक्षांची सूत्रे दिली गेली त्या उद्धव ठाकरे यांच्या कुचकामी नेतृत्वामुळे अनेक जीवाभावाचे शिवसैनिक आणि पदाधिकारी संघटनेपासून दूर झाले. बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेल्या विचारांना तिलांजली देण्याचे काम सध्याच्या नेतृत्वाने केल्याने, मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून आमदार, खासदार, नगरसेवक, शाखाप्रमुख, गटप्रमुख, शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदे गटात सामील होत आहेत. दिवसेंदिवस आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे खरी शिवसेना ही शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गटाची आहे हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही.
गेले काही दिवस माध्यमांमध्ये एकच चर्चा आहे, ती शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची. पक्ष एक आणि गट दोन पडल्याने कोणता झेंडा घेऊ हाती अशी अवस्था काही सामान्य शिवसैनिकांची झाली असावी. शिवसेनेतील ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या मैदानावर होत आहे. दोन्ही गटांकडून बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनर्स लावून शिवसैनिकांना आवाहन केले जात असून शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन गटांचे दोन दसरा मेळावे मुंबईत होणार आहेत. या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी दोन्ही गटांकडून सुरू आहे.
उभय गटांनी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधील शिवसैनिकांना मेळाव्यासाठी मुंबईत आणण्याची मोहीम हाती घेतली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांना एमएमआरडीए मैदानावर आणण्याची योजना शिंदे गटाने आखली आहे. गावागावांतून मोठ्या संख्येने शिवसैनिकांचा मोठा ताफा बसमधून मुंबईत येईल. त्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या अख्यत्यारीत असलेले मैदान, सोमय्या मैदानात वाहनतळ उभारून व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईत आल्यानंतर शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये याची दक्षता उभय गटांचे परगावातील शिवसैनिक विरोधकांच्या मेळाव्यात हजेरी लावू नयेत यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. तसेच ठाकरे गटाचे शिवसैनिकही एमएमआरडीएच्या दिशेने फिरकू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रवासादरम्यान कोणताही त्रास होऊ नये याचीही काळजी घेण्यात येत आहे. मुंबईबाहेरून येणारी शिंदे गटाची वाहने मुंबई विद्यापीठाचे कलिना संकुल, वांद्रे–कुर्ला संकुलातील मोकळी जागा, सोमय्या मैदानावर उभी करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षात सध्या कमालीची अस्थिरता आहे. मुंबईत दोन्ही गटांत गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत हाणामारी झाली होती. राज्यात अनेक ठिकाणी दोन गट आमने-सामने आले आहेत. त्यामुळे शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदानावर एकाच दिवशी आणि एकाच वेळी आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यांचा ताण पोलीस यंत्रणेवर पडलेला दिसत आहे. कायदा आणि सुवस्था राखणे आणि वाहतूक कोंडी ही दोन मोठी आव्हाने पोलिसांपुढे आहेत. दोन्ही गट आपल्या मेळाव्यात विक्रमी गर्दी होईल, असा दावा करीत असल्याने पोलिसांवरील ताणही ‘विक्रमी’ वाढणार आहे. त्यामुळे गेले तीन दिवस पोलीस यंत्रणाही या दोन मैदानांच्या भोवती जातीने लक्ष घालत असल्याचे दिसून येते. मुंबई पोलिसांबरोबर राज्य राखीव पोलीस दल, शीघ्र कृती दल दोन्ही ठिकाणी तैनात करण्यात येत आहे.
शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून दरवर्षी दसऱ्याला शिवाजी पार्कवर मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. यासाठी पक्षाप्रमाणे पोलिसांच्या वतीने कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो. मात्र शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत आणखी एक गट तयार झाला असून या गटाचा मेळावा वांद्रे येथील बीकेसी मैदानावर आयोजित होत आहे. एकाच दिवशी आणि एकाच वेळी दोन्ही मेळावे आयोजित करण्यात आल्यामुळे पोलिसांना दोन्ही ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.
दोन्ही गटांमधून एकमेकांवर सुरू असलेल्या टीका, झटापटीच्या घटना, आयोजनावर न्यायालयात झालेला वाद या पार्श्वभूमीवर या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांनी चाचपणी सुरू केली आहे. बीकेसी येथे होणाऱ्या मेळाव्याला मुख्यमंत्री तसेच इतर मंत्री उपस्थित राहणार असल्याने नियमावलीप्रमाणे त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे लागणार आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि त्यांचे शिवसैनिकही मेळाव्यासाठी एकत्र येणार असल्याने या ठिकाणीही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी पोलिसांना घ्यावी लागणार आहे.