Monday, October 7, 2024
Homeताज्या घडामोडीसीबीआयकडून देशभरात १०० हून अधिक ठिकाणी छापेमारी

सीबीआयकडून देशभरात १०० हून अधिक ठिकाणी छापेमारी

‘ऑपरेशन चक्र’ अंतर्गत राबविण्यात आली शोध मोहीम, सायबर फसवणूकीविरोधात केंद्राची जोरदार मोहीम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अन्वेषण विभागाने सायबर फसवणुकीविरोधात मोहीम सुरू केली आहे. तपास यंत्रणेने देशातील १०० हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. विशेष म्हणजे इंटरपोल, फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन यांसारख्या एजन्सींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयने कारवाई केली आहे.

सायबर गुन्हेगारांविरुद्धच्या मोहिमेचा एक भाग म्हणून सीबीआयने अनेक राज्यांमध्ये ११५ ठिकाणी छापे टाकले. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिस दलांच्या सहकार्याने ‘ऑपरेशन चक्र’ अंतर्गत शोध मोहीम राबविण्यात आली. सीबीआयने ८७ ठिकाणांचा शोध घेतला, तर राज्य आणि केंद्रशासित प्रदेश पोलिसांनी २८ ठिकाणांचा शोध घेतला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दिल्लीत पाच ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. तपास यंत्रणेने राजस्थानमधील राजसमंदमध्ये एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. त्याचवेळी पुणे आणि अहमदाबादमध्ये अमेरिकेतील नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या दोन बनावट कॉल सेंटरचाही पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणांमध्ये ३०० हून अधिक संशयितांची चौकशी सुरू आहे. ‘ऑपरेशन चक्र’चा एक भाग म्हणून अंदमान आणि निकोबारमध्ये चार, दिल्लीतील पाच, चंदीगडमध्ये तीन, पंजाब-कर्नाटक आणि आसाममध्ये प्रत्येकी दोन ठिकाणी शोधमोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सीबीआयने या कारवाईची माहिती अमेरिकन तपास संस्था एफबीआयला दिली आहे. इंटरपोल, एफबीआय, रॉयल कॅनेडियन माउंटन पोलिस आणि ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -