पालघर (वार्ताहर) : पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा सध्या मृत्यूचा सापळा झाला आहे. काही ठिकाणी तीन मार्गिकेचे रुपांतर दोन मार्गिकेमध्ये अचानक होत असल्याने वाहन चालकाचा गोंधळ उडतो. याच कारणामुळे काही दिवसांपूर्वी भारतातील प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघात होवून मृत्यू झाला होता. तर या महामार्गावरील मनोर ते चिंचोटी या भागात अडीच वर्षांत साडेचारशे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यात किरकोळ जखमी गंभीर दुखापतांची संख्या साडे सहाशे असून तब्बल ९८ नागरिकांना मृत्यूला सामोरे जावे लागले. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग असुरक्षित असून नियमांचे उल्लंघन व अनेक समस्यांमुळे दुर्घटना वाढत आहेत, तरी याकडे राष्ट्रीय प्राधिकरण विभाग व लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
महामार्गालगत मनोर भागात बोईसरसह पालघरमधील औद्योगिक पट्टा येतो. विरार, नालासोपारा, वसई, कामण मार्ग ते चिंचोटी अशा जोडल्या गेलेल्या मार्गावरून भिवंडी, ठाणे, वरसावे पूल असा प्रवास होत असतो. मनोर व चिंचोटीदरम्यान औद्योगिक वसाहतीचा भाग अधिक आहे. त्यामुळे या ठिकाणाहून अवजड वाहनांची संख्या अधिक आहे. त्याचबरोबर महामार्गाला लागून असणाऱ्या गावातील नागरिक दुचाकी, चारचाकीने प्रवास करत असतात. मात्र या ठिकाणी सुविधा बोटावर मोजण्याइतक्या आहेत. महामार्गावर वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. उड्डाण पुलालगत पथदिव्यांचा अभाव, तर जेथे पथदिवे आहेत ते बंद आहेत. त्यामुळे अनेकदा हा परिसर अंधारात असतो. विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग असताना येथील विजेचे बिल थकीत झाल्यास बत्ती गुल होते.
मनोर व चिंचोटी भागात ब्लॅक स्पॉट म्हणजे अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. या भागात मृत्यू, जखमींची संख्या रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वाहने सावकाश चालवा असे फलक लावण्याशिवाय कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे २०२२ सालच्या सहा महिन्यांत ३९ जणांवर काळाने झडप घातली आहे. एकीकडे राष्ट्रीय महामार्ग सुरक्षित असेल, अशी आशा वाहनधारकांकडून बाळगली जाते. मात्र मनोर ते चिंचोटीदरम्यान प्रवास करताना अनेक अडथळ्यांचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे.
महामार्ग प्राधिकरणाकडून सुविधाचा अभाव
विरार -खानिवडे येथे टोल नाका असला तरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. तसेच महामार्गावर खड्डेमय रस्ते, सेवा रस्त्यांवर वाहने, आजूबाजूला अनधिकृत धाबे, वाहनांतून क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक असे प्रकार होत आहे. तसेच महामार्गावर रस्ता दुभाजक असले तरी काही जण स्वतःच्या सोईसाठी तोडतात. यामुळे अपघातांत वाढ झाली आहे.