शिबानी जोशी
राष्ट्रसेविका समितीच्या देशभरात अनेक शाखा आहेत. शाखेत जाणाऱ्या सेविकांना त्या त्या ठिकाणचे प्रश्न, समस्या समाजात दिसून आल्या की त्या त्या ठिकाणी सामाजिक काम करण्याचा वसाही समितीच्या सेविकांनी घेतलेला आपल्याला दिसून येतो. ठाण्यातील राजमाता जिजाबाई ट्रस्टची माहिती घेत असतानाच मला महाराष्ट्र बाहेरच्या हैदराबाद इथल्या राणी रुद्रमा सेवा समिती विषयी माहिती कळली म्हणून मी या संस्थेमध्ये चाळीस वर्षांपासून काम करत असलेल्या समिती सेविका सुषमा पटवर्धन यांच्याशी संपर्क साधला आणि या संस्थेची माहिती जाणून घेतली. मराठी माणसं कामधंद्यानिमित्त देशाच्या विविध राज्यांमध्ये वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या जाऊन राहिली आहेत. अशाचपैकी आलेल्या काही मराठी महिला हैदराबादसारख्या ठिकाणी एकत्र येऊन समितीचे छोटे मोठे काम करत होत्या.
रमादेवी रेड्डी आणि त्यांचे पती वरधा रेड्डी हे सुद्धा संघाचे कार्यकर्ते होते. रमा रेड्डी याही समितीच्या सेविका होत्या. त्यांचा माननीय मावशी केळकर यांच्याशी संपर्क आला आणि त्यांना अशी एखादी संस्था सुरू करावी असं वाटलं. त्यांनी आपल्याकडची जमीन दान केली. समितीची फॉर्मल स्थापना १९८१ साली करण्यात आली. सुरुवातीला एक मोठा हॉल बांधण्यात आला. रमा देवींची कन्या प्रभावती रेड्डींनी रमादेवींच्या पश्चात ट्रस्टच्या प्रगतीसाठी खूप धडपड केली. इमारतीचे बांधकाम करण्यासाठी निधी उभा केला. आजही ८० वर्षांच्या प्रभावती जी रोज छात्रावासात येऊन मुलींची चौकशी करतात. प्रभावतींसारख्या अनेक मराठी, तेलुगू सेविकांचा संस्थेच्या उभारणीत खूप मोठा वाटा आहे. सुरुवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वात्सल्य सिंधू संस्थेला ती जागा वापरायला देण्यात आली होती. त्यानंतर कालांतराने वात्सल्य सिंधू या संस्थेने स्वतःची वास्तू उभारली. आता जागा काही वेगळे उपक्रम करण्यासाठी रिकामी झाली होती. त्यामुळे काहीतरी वेगळे कार्य सुरू करायचे असे ठरवण्यात आले आणि मग मुलींना शिक्षण देऊन आत्मनिर्भर करणे, सुसंस्कारित करणे यासाठी काम करायचे ठरले.
गरीब, होतकरू मुलींसाठी निवासाची व्यवस्था तसेच त्यांना जवळच्या संघाच्या सरस्वती शिशू मंदिर या शाळेत शिक्षण दिलं जातं असे. थोडक्यात या मुलींच्या निवास, भोजन तसेच शिक्षणाची, गणवेश या व्यवस्था संस्थेतर्फे सुरू करण्यात आल्या. सुरुवातीला ८, १० मुली आल्या. आतापर्यंत अडीचशे ते तीनशे मुली या ठिकाणी शिकून मोठ्या झाल्या आहेत. त्यातील तीन मुली इंजिनीअर झाल्या आहेत, काही मुली शासकीय अधिकारी आहेत. समाज अनेकांना सतपात्री दान करण्याची इच्छा असते, असे लोक या मुलींना कधी पुस्तक, गणवेश देतात. सेविका समितीने अष्टभुजा देवीला आपलं दैवत मानलं आहे. संस्थेच्या आवारात अष्टभुजा देवीचं मंदिर उभारलं गेलं. या ठिकाणी महिला एकत्र येऊन धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम करत असतात.
दक्षिणेकडे गोमातेला महत्त्व असल्यामुळे देवळामध्ये गायही आहे. गोमाता पूजन, कुमकुमार्चन असे सण समारंभ या देवळात नित्यनेमाने साजरे केले जातात. नवरात्रीमध्ये अनेक वेळा देवीला साड्या, खण पीस अर्पण केले जातात. या साड्यांचे सुंदर असे कपडे इथल्या मुली स्वतःसाठी शिवतात आणि त्याचा सदुपयोग केला जातो. त्याशिवाय कधी कधी अतिरिक्त साड्यांच्या पिशव्या शिवूनही अतिशय सवलतीच्या दरात म्हणजे दहा-वीस रुपयांत या पिशव्यांची विक्री केली जाते. ‘प्लास्टिक टाळा आणि कापडी पिशव्या वापरा’ हा संदेश यानिमित्ताने दिला जातो. या मुलींना स्वयंपाक शिकता यावा यासाठी छात्रावासाच्या स्वयंपाक घरात त्या मेट्रनना आवडीनी मदतही करतात. कोरोना काळात या मुलींनी समाजसेवाही केली. अनेक रुग्णांना विनामूल्य डबे करण्यात आले होते. याच आवारामध्ये राष्ट्रसेविका समितीची शाखा चालत असल्यामुळे मुलींना तिथे संस्कार, खेळ, योगासन ही शिकवले जातात. संगणकाचे प्रशिक्षण दिले जाते. यापैकी कोणत्याही क्षेत्रात एखाद्या मुलीला गती असेल, तर ती शिक्षण पूर्ण झाल्यानंतर योगासन शिकवू शकते, संस्कार वर्ग चालवू शकते, उत्तम स्वयंपाक करू शकते, शिवणकाम करू शकते हा या मागचा हेतू आहे. इथल्या छात्रवासात राहिलेल्या मुलींपैकी जवळजवळ २५ मुली आज विविध ठिकाणी संस्कार वर्ग तसेच योगासन वर्ग घेत आहेत. चांगली चित्रकला असलेल्या काही मुली ग्रीटिंग तयार करतात. ज्या दानशूर व्यक्तीला संस्थेला दान करत असतात, त्यांना ती पाठवली जातात. त्यानिमित्ताने त्यांचे आभार व्यक्त करण्याची संधी मिळते. उत्सवाच्या वेळी केले जाणारे पदार्थ बनवून त्याची विक्री ही छात्रावासातील मुली आणि समितीच्या सेविका करत असतात.
त्याशिवाय अम्मुगुडा या ठिकाणी इयत्ता पाचवीपर्यंतची शाळा देखील संस्थेतर्फे चालवली जाते. त्या भागामध्ये तळागाळातील, धुणे-भांडी करणाऱ्या बायकांची वस्ती आहे, त्या भागात सुरुवातीला घरोघरी जाऊन मुलांना शिकवण्यासाठी घराजवळ शाळा सुरू होत आहे. तिथे पाठवावे, चांगले शिक्षण दिले जाणार आहे, असे सांगून विद्यार्थी गोळा केले होते. या शाळेमध्ये ७० मुले शिक्षण घेत आहेत. पूर्वी त्या ठिकाणी शाळा येण्यापूर्वी ही मुले नुसतीच रस्त्यात दिवसभर हिंडत-फिरत असायची; परंतु ही मुले शाळेत येऊ लागल्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या सोसायटीतील लोकांनाही आनंद झालेला दिसून आला आहे. भविष्यात रुग्णोपयोगी वॉकर, व्हिल चेअर अशा वस्तू भाड्याने द्याव्या तसेच एक फिजिओथेरपीचे सेंटर सुरू करावे, असा मानस आहे. संस्थेचे ब्रीदवाक्य आहे, ‘शिव भावेन जीव सेवा!,’ त्यानुसार अथक मार्गक्रमणा संस्थेला करायची आहे.