राजापूर (प्रतिनिधी) : वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे अनेक आजार फोफावत आहेत. यात जनावरेही सुटलेली नाहीत. सध्या जनावरांवर सांसर्गिक गर्भपाताचे संकट घोंगावत आहे. जनावरांना होत असलेल्या लम्पीच्या प्रादुर्भावानेही डोके वर काढले आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पशुसंवर्धन विभागाच्यावतीने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेतर्गंत जनावरांना प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे. तालुक्यातील सुमारे ३२ हजार जनावरांपैकी साडेसहा हजार जनावरांना लसीकरण केल्याची माहिती पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागातील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. सुर्वे यांनी दिली.
बदलत्या वातावरणामुळे विविध रोग आणि साथींचा फैलाव होत असताना जनावरांनाही सांसर्गिक गर्भपाताचे संकटाचा सामना करावा लागत आहे. जनावरांना हा आजार ब्रुसेला बॅक्टेरीयापासून होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या संसर्गाचा परिणाम जनावरांच्या गर्भधारणेवर होतो. आजार संसर्गजन्य असल्याने त्याचा धोका एकमेकांच्या सानिध्यातील सर्व जनावरांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने ही लसीकरण मोहीम हाती घेतली आहे.
अशा आजाराचा संसर्ग झाल्याची तालुक्यात जनावरे सद्यस्थितीमध्ये आढळून आलेली नाहीत. मात्र, तालुक्यातील सुमारे ३२ हजार जनावरांना हे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सुर्वे यांनी दिली. तालुक्यातील गावे विखुरलेली असल्याने लसीकरणाच्या वेगाला मर्यादा येत असल्या तरी कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त जनावरांना लसीकरण करण्याचे नियोजन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माणसांनाही जनावरांपासून धोका
जनावरांना होणार हा आजार संसर्गजन्य आहे. त्याचा संसर्ग जनावरांपासून जनावरांना तर होतोच. शिवाय बाधित झालेल्या जनावरांपासून हा संसर्ग पशुपालकांनाही होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे हा आजार अधिक घातक असल्याने त्यावर वेळीच प्रतिबंध करण्याच्यादृष्टीने शासनाने पावले उचलली आहेत.