Sunday, July 14, 2024
Homeक्रीडाआशिया चषक स्पर्धेत भारतीय महिलांची युएईवर मात

आशिया चषक स्पर्धेत भारतीय महिलांची युएईवर मात

सिल्हेट (वृत्तसंस्था) : जेमीमाह रॉड्रीग्स आणि दीप्ती शर्मा ही फलंदाजांची जोडी मंगळवारी भारतासाठी संकटमोचकच नाही तर सामना विजेती ठरली. दोघींच्याही उपयुक्त अर्धशतकांमुळे युएईविरुद्धच्या सामन्यात भारताने विजय मिळवत दसऱ्याच्या पूर्वसंध्येला आशिया चषक स्पर्धेत विजयाच्या हॅटट्रीकचे सोने लुटले. भारताच्या गोलंदाजांनीही कमालीची गोलंदाजी करत युएईला २० षटकांत ४ फलंदाजांच्या बदल्यात केवळ ७४ धावाच करू दिल्या. त्यामुळे १०४ धावांनी भारताने हा सामना खिशात घातला. स्पर्धेतील सलग तिसऱ्या विजयामुळे गुणतालिकेत भारतीय संघ ६ गुणांसह अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.

१७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या युएईच्या संघाला भारताने पहिल्या दोन षटकातच तीन धक्के दिले. तेथेच युएईने मानसिकदृष्ट्या हा सामना सोडला होता. त्यानंतर मात्र त्यांच्या फलंदाजांनी कमालीचा संयम दाखवत सामना जिंकण्यापेक्षा ऑलआऊट वाचविण्यावर अधिक भर दिला. त्यात ते यशस्वी ठरले, परंतु सामना जिंकण्याचे त्यांचे स्वप्न कोसो दूर राहिले. कविशा इगोडागेने ५४ चेंडूंत नाबाद ३० धावा केल्या. तिला खुशी शर्माने संयमी साथ दिली. खुशीने ५० चेंडूंत २९ धावा जमवल्या. युएईला २० षटकांत केवळ ७४ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यांचे ४ फलंदाज बाद झाले. भारताचे जवळपास सर्वच गोलंदाज धावा रोखण्यात यशस्वी ठरले. राजेश्वरी गायकवाड विकेट मिळवण्यातही यशस्वी ठरली. तिने ३ षटकांत २० धावा देत २ फलंदाजांना माघारी पाठवले. दयालन हेमलथाने ३ षटकांत ८ धावा देत १ विकेट मिळवली.

तत्पूर्वी नाणेफेकीचा कौल जिंकत भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात अडखळत झाली असली, तरी जेमीमाह रॉड्रीग्सचे बॅट आजही चांगलीच तळपली. तिला दीप्ती शर्माने तोलामोलाची साथ दिली. या दोघींनी वैयक्तिक अर्धशतक झळकावले. त्यामुळे अवघ्या २० धावांवर ३ फलंदाज बाद अशा अडचणीत असलेल्या भारताला या जोडीने सावरलेच नाही, तर सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. जेमीमाहने ४५ चेंडूंत नाबाद ७५ धावा तडकावल्या. दीप्ती शर्माने ४९ चेंडूंत ६४ धावा जमवल्या. या दोघींच्या खेळीच्या जोरावर भारताने २० षटकांत ५ फलंदाजांच्या बदल्यात १७८ धावांचा डोंगर उभारला. जेमीमाह, दीप्ती वगळता भारताचे अन्य फलंदाज युएईविरुद्ध अपयशी ठरले. युएईच्या महिका गौरने प्रभावी गोलंदाजी केली. तिने ४ षटकांत अवघ्या २७ धावा देत १ बळी मिळवला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -