अहमदाबाद (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष संघांनी दसऱ्याच्या पू्र्वसंध्येला सुवर्णपदक जिंकून दुहेरी पदक विजयाची कामगिरी केली. दोन्ही गटात निविर्वाद वर्चस्व गाजवत महाराष्ट्राच्या खो-खो खेळाडूंनी दुहेरी सुवर्णपदकाची भेट देऊन विजयादशमीचा आनंद द्विगुणित केला.
संस्कारधाम इनडोअर स्टेडियममध्ये मंगळवारी झालेल्या अंतिम लढतीत महिला गटात महाराष्ट्र संघाने ओडिशा संघावर डावाने विजय साकारत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. महाराष्ट्र महिला खोखो संघाने १८-८ असा एक डाव व १० गुणांनी ओडिशा संघाचा पराभव केला. महाराष्ट्र संघाकडून रुपाली बडे हिने ३ मिनीटे संरक्षण करुन सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. प्रियांका भोपी हिने अष्टपैलू कामगिरी नोंदवली. प्रियांका भोपी हिने २.५० आणि ३.५० मिनीटे पळतीचा खेळ केला आणि २ गुण देखील मिळवले. प्रियांका इंगळे हिने १.५० मिनीटे संरक्षणाचा उत्कृष्ट खेळ केला. तसेच तिने ८ गुण मिळवून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. रेश्मा राठोड हिने २.५० मिनीटे संरक्षण केले. रुपाली बडे हिने ३ मिनीटे पळतीचा खेळ करून सर्वांचीच वाहवा मिळवली. अपेक्षा सुतार हिने १.४० मिनीटे संरक्षण केले व दोन गुण देखील मिळवले. संपदा मोरे हिने १.२० मिनीटे नाबाद संरक्षण केले. ऋतुजा खरे हिने दोन गुण मिळवले. ओडिशाकडून निकिता साहू, शुभाश्री व मागी माझी यांनी अष्टपैलू कामगिरी बजावली.
पुरुष गटात महाराष्ट्र संघाने केरळ संघाविरुद्ध आक्रमक खेळत सुवर्णपदक जिंकले. महिला गटाप्रमाणेच महाराष्ट्राचा पुरुष संघ डावाने जिंकतो की काय याची मोठी उत्सुकता होती. मात्र, महाराष्ट्र संघाने केरळचा चुरशीच्या लढतीत सात मिनीटे राखून व ४ गुणांनी (३०-२६) विजय साकारत गोल्ड पटकावले.
महाराष्ट्राच्या सर्वच खेळाडूंची लक्षवेधक कामगिरी ठरली. अक्षय भांगरे याने २ मिनीटे व १.१० मिनीटे संरक्षण केले. रामजी कश्यप याने १.३० मिनीटे व २ मिनीटे पळतीचा सुरेख खेळ केला. ह्रषिकेश मुर्तावडे याने अष्टपैलू कामगिरी बजावली. त्याने १.४० व १.३० मिनीटे पळतीचा सुरेख खेळ केला व ६ गुण मिळवून संघाच्या सोनेरी यशात मोलाचा वाचा उचलला. सुरेश गरगटे याने १.२० मिनीटे संरक्षण केले व १४ गुण घेऊन संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. प्रतिका वाईकर याने १.२० मिनीटे पळतीचा खेळ केला. लक्ष्मण गवस याने ४ गुण मिळवले. केरळकडून निहाल, श्रीजेश व अभिराम यांनी झुंज दिली.