Monday, June 16, 2025

नवरात्रौत्सवात आदिवासींच्या संसाराला श्रमाची फुले; कमळाच्या विक्रीतून आर्थिक आधार

नवरात्रौत्सवात आदिवासींच्या संसाराला श्रमाची फुले; कमळाच्या विक्रीतून आर्थिक आधार

शहापूर (वार्तहर) : पोटाची खळगी भरण्यासाठी सतत कष्टप्रद काम करणाऱ्या तालुक्यातील आदिवासी बांधवांना नवरात्रौत्सवात कमळ फुलांच्या विक्रीतून मोठा आर्थिक आधार मिळत आहे. चिखलात रुतून बसलेले कमळ काढण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता आदिवासी बांधव चिखल, गाळात, तलावातील खोल पाण्यात उतरून एक एक कमळाची फुले काढून ती एका टोपलीत गोळा करतात व शहरात आणून नवरात्रौत्सवात ती विकून रोजीरोटीची कमाई करणे हा त्यांचा नित्याचाच दिनक्रम होय.


शहापूर तालुक्यातील आदिवासी महिला दरवर्षी नवरात्रौत्सवात कमळाची फुले विकत असतात. यातून नवरात्रीच्या नऊ दिवसांत त्यांना मोठा आर्थिक आधार आणि रोजगार मिळतो. नवरात्रौत्सवात देवीच्या चरणी वाहण्यासाठी मोठ्या श्रद्धेने नऊ दिवस भाविकांकडून कमळाच्या फुलांना प्रचंड मागणी असते. ही कमळाची फुले शहापूरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आदिवासी महिला आणत आहेत.


सध्या शहापूरातील अंबिकामाता मंदिराबाहेर आदिवासी महिला कमळाची फुले १० रूपयांना एक अशा माफक दराने विक्री करून नवरात्रौत्सवात रोजगार कमवित आहेत. शहापूर तालुक्यातील लहान तलाव व ओहोळाच्या काठावरील चिखलात ही कमळाची फुले उगवतात. ही फुले पाण्यात उतरून मोठ्या मेहनतीने काढून टोपलीत भरून शहापूर शहरात ती विक्रीसाठी आणली जातात.


कमळाची फुले मिळवण्यासाठी भल्या पहाटे तलाव गाठावा लागतो. तलावाच्या काठावरील चिखल तुडवित पाण्यात उतरून कमळ फुलांचा शोध घ्यावा लागतो. कमळाच्या फुलांबरोबर झेंडूची, खुरासनीची पिवळी फुलेही आदिवासी महिलांनी विक्रीसाठी सध्या आणली आहेत. दिवसभरात या फुलांच्या विक्रीतून ३०० ते ४०० रुपये कमाई होते, असे कमल निरगुडा या आदिवासी फुल विक्रेत्या महिलेने सांगितले.

Comments
Add Comment