Tuesday, July 23, 2024
Homeमहत्वाची बातमीरत्नागिरी जिल्ह्याला महीला कुस्तीत पहिले रौप्य पदक

रत्नागिरी जिल्ह्याला महीला कुस्तीत पहिले रौप्य पदक

मुंबई विद्यापिठाची आंतर महाविद्यालयीन स्पर्धा

रत्नागिरी (प्रतिनिधी) : आतापर्यंत पुरूषांची मक्तेदारी असलेल्या कुस्ती खेळात महिलांचा सहभाग तसा नगण्यच असतो. त्यातही रत्नागिरीसारख्या जिल्ह्यामध्ये जिथे पुरूषांची संख्याच नगण्य आहे. अशा खेळात जिल्ह्यातील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने केवळ सहभागच दर्शवला नाही तर आपल्या कुस्तीची झलकदेखील दाखवून दिली आहे. अंतिम फेरीपर्यंत जोरदार मुसंडी मारत तिने जिल्ह्याला मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन कुस्तीतील पहिले रौप्यपदक मिळवून दिले आहे. यामुळे कुस्तीगीरांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत असून मानसीवर अभिनंदनाचा वर्षाव आहे.

खोपोली येथे १ ते २ ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेमध्ये कुमारी मानसी संजय महाडिक (कामथे-चिपळूण) हिने ५३ किलो खालील वजनी गटामध्ये यशस्वी सहभाग घेतला. सदर स्पर्धेमध्ये मानसीने अंतिम फेरीपर्यंत जोरदार मजल मारत रौप्य पदकाची कमाई केली. मानसी आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळणारी रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली महिला कुस्ती खेळाडू आहे. मानसी चिपळूण तालुक्यातील डीबीजे महाविद्यालय चिपळूण येथे वाणिज्य शाखेतील तिस-या वर्षामध्ये शिक्षण घेत आहे. पुढील विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी मानसीची निवड करण्यात आली आहे.

सामान्य कुटुंबात मानसी जन्माला आली असून ती अत्यंत मेहनती खेळाडू असल्याचे प्रशिक्षकांकडून सांगण्यात आले. दरम्यान, वैभव चव्हाण यांच्याकडून ती कुस्ती या खेळाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेत आहे. मानसीच्या यशाबद्दल तिच्यावर डीबीजे कॉलेज, रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी, पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मानसीच्या यशामुळे भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यासह महिला कुस्तीगीरांची संख्या नक्कीच वाढेल असा आशावाद असोसिएशनकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -