नागपूर (प्रतिनिधी) : एसटी कामगाराच्या संपाचे नेतृत्व करणारे नेते अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना नागपूर येथे राष्ट्रीय स्वयसेवक संघाच्या यंदाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण देण्यात आले आहे. या आधी अॅड. सदावर्ते यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचे कौतुक करत गांधीजींवर टीका केली होती. त्यानंतर संघाच्या कार्यक्रमासाठी त्यांना देण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
यंदाचा विजयादशमी कार्यक्रम विशेष असणार आहे. यंदाच्या विजयादशमीच्या एका कार्यक्रमाला अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मुख्य अतिथी म्हणून बोलावण्यात आले आहे. विजयादशमी निमित्ताने नागपुरात होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष असते. या दिवशी विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी रान उठवले होते. अॅड. सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य कराव्यात यासाठी त्यांनी मोठा संप घडवून आणला होता. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.