नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ५जी नेटवर्क अधिकृतरित्या लाँच केल्यानंतर देशभरातील आठ शहरांमध्ये ५जी सेवा सुरु केली आहे. पूर्ण देशभरात ही सेवा मिळण्यासाठी काही काळ लागणार आहे. गावागावात ५जी ची रेंज येण्यासाठी २०२४ उजाडणार आहे. असे असताना आता बीएसएनएलने ५जीची घोषणा केल्याने एअरटेल, रिलायन्स जिओच्या गोटात खळबळ उडाली आहे.
सरकारी कंपनी जी आजवर ४जी लाँच करू शकली नाही, ती आता ५जी मध्ये उतरणार आहे. गावागावात नेटवर्क असलेली भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएल कंपनीने ५जी सेवा देण्याची घोषणा केली आहे. बीएसएनएल ची ५जी सर्व्हिस १५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु होणार असल्याची घोषणा टेलिकॉम मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. याची घोषणा इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये करण्यात आली. यामुळे तीन खासगी कंपन्या आणि एक सरकारी कंपनी असे चार कंपन्यांमधील चांगल्या स्पर्धेचे एक स्वस्त नेटवर्क तयार होईल, असे वैष्णव यांनी म्हटले आहे.
बीएसएनएल आताकुठे नेटवर्कवर ४जी लाँच करत असताना पुढील वर्षी ५जीचे लक्ष्य कसे साध्य करू शकेल, असे विचारले असता, वैष्णव म्हणाले की ४जी वरून ५जी ला जाणे खूप कठीण नाही. या कालावधीत ते साध्य केले जाऊ शकते. बीएसएनएलचे ५जी नेटवर्क नॉन-स्टँडअलोन आर्किटेक्चरवर आधारित असेल. यामध्ये ऑपरेटर तुलनेने कमी गुंतवणुकीसह त्यांच्या विद्यमान नेटवर्क पायाभूत सुविधांचा जास्तीत जास्त वापर करू शकतात, असे ते म्हणाले.
५जी बाबत बोलताना वैष्णव यांनी पुढील सहा महिन्यांत २०० शहरांत ५जी सेवा पोहोचणार असल्याचे आश्वासन दिले. पुढील दोन वर्षांत देशातील ८० ते ९० टक्के भागात ५जी सेवा मिळेल. ५जी सेवा ही परवडणारी देखील असेल, असे ते म्हणाले.
दरम्यान, एअरटेलने दिल्ली, वाराणसी, मुंबई, बंगळूरू, सिलिगुडी, हैदराबाद, कोलकाता आणि चेन्नईमध्ये आजपासून ५जी सेवा सुरु केली आहे.