विलास खानोलकर
लक्ष्मण पंडितांनी गोविंदरावांसमक्ष श्री स्वामी समर्थांस नवस केला की, आठ दिवसांत श्री स्वामींच्या कृपेने जर आपण कर्जमुक्त झालो, तर अक्कलकोटास जाऊन श्री स्वामी चरणाचे दास होऊ. पुढे आठ दिवसांत आश्चर्यकारकरीत्या त्यांना व्यापारात नफा होऊन त्यांचे कर्ज फिटले. श्री स्वामी समर्थांचे नियोजन-प्रयोजन याचा प्रत्यय या भागात येतो. ईश्वऱ्या नावाचा मारवाडी पंडिताकडे आला. जामीन म्हणून सही करणाऱ्याच्या नावे दोन हजार रुपये आले, असे त्यास सांगितले. पंडिताला श्री स्वामींचा हा रोकडा अनुभव आला. त्या दोन हजार रुपयांमुळे हरिभाऊ तावडे, गजानन खत्री आणि लक्ष्मण पंडित हे तिघेही ऋणमुक्त झाले. ही सर्वच किमया कशी घडली? कोणी घडविली? अर्थातच श्री स्वामी समर्थांनी. श्री स्वामींनी त्यांचे काम केले. आता श्री स्वामींशी केलेला वायदा पाळण्यासाठी ते तिघेही अक्कलकोटास आले. श्री स्वामींचे दर्शन घेऊन महाराजांपुढे उभे राहताच श्री स्वामी महाराज म्हणाले, व्यापार केला; तोटा आला, मला नवस केला. दोन हजार रुपये नफा झाला. ते तिघेही काय समजायचे ते समजून गेले. प्रत्यक्ष श्री स्वामी महाराज ईश्वर मारवाड्याच्या रूपाने आले, याची त्यांना खात्री पटली. लक्ष्मण पंडितांसह ते दोघेही श्री स्वामीचरणी लीन झाले. आजही श्री स्वामी समर्थ कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून अनेकांना सहकार्य करीत असतात. त्या संबंधांत डॉ. वि. म. भटांनी योग सिद्धी व साक्षात्कार या ग्रंथात पृ. ३९८ माझा हृदयरोग यात व वैद्यांच्या श्री स्वामी समर्थ कोषात प्रचितीचे बोल यात अशा विविध ठिकाणी चिकित्सक अभ्यासू, विद्वानांनी आपली मते नोंदविली आहेत. श्री स्वामींचे आद्य चरित्रकार ना. ह. भागवत हे कमालीचे नास्तिक होते.
तरीही श्री स्वामी चरित्र लिहिण्यास का उद्युक्त झाले. (इ.स.१८७९) ते त्यांनी प्रांजळपणे सांगितले आहे. मुख्य मुद्दा व त्याचा मथितार्थ हाच आहे की, श्री स्वामी चांगल्या गोष्टीस विविध माध्यमे प्रसंगाद्वारे सदैव मदतच करतात. श्री स्वामींच्या व्यक्तिगणित क्लृप्त्या वेगवेगळ्या असतात. त्या समजण्यास अथवा आकलनास आपल्या गाठी थोडे तरी पुण्यकर्म असावे लागते. सत्कर्म सचोटीने पुण्यसाठा सतत वाढता ठेवावा लागतो. अनेकदा कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये यांचा योग्य समन्वय साधून सद्सद्विवेकाने प्रपंच करावा लागतो. तो करताना श्री स्वामींप्रति सतत साक्षीभाव ठेवावा लागतो. प्रपंचात असावा लागतो. कदाचित एखाद्या गोष्टीस उशीर होईल पण अंतिम सुख-समाधान निश्चित, नवस (वायदा) आणि दृढविश्वास यात फरक आहे. इच्छित कार्य झाले, नवसाची (वायद्याची) पूर्तता केली, नवस फेडला की देव विस्मृतीत जातो. पण मनाशी पक्का दृढनिश्चय असेल, तर देव कायम स्मरणात राहतो. तेथे आपणास दृढनिश्चय करण्याचा बोध घ्यायचा आहे. स्वामींचे नामस्मरण तुम्हाला मदत करते.