Thursday, April 24, 2025
Homeमहाराष्ट्रपालघरपारंपरिक मासेमारीला धोका, जाळ्यात प्लास्टिकचा कचरा; मच्छीमार चिंतेत

पारंपरिक मासेमारीला धोका, जाळ्यात प्लास्टिकचा कचरा; मच्छीमार चिंतेत

पालघर (प्रतिनिधी) : पालघर तालुक्याच्या दक्षिण किनारपट्टीवर असलेल्या एडवण, कोरे, दातिवरे या समुद्रकिनारपट्टीवर मच्छीमारांच्या जाळय़ात माशांऐवजी प्लास्टिक येते आहे. प्लास्टिक कचरा आणि सागरी प्रदूषणामुळे पारंपरिक मासेमारीला धोका निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे मच्छीमार समाजाच्या चिंतेत भर पडली आहे.

एडवण गावाच्या समुद्रकिनाऱ्यावर तिवराचे जंगल आहे. त्यामुळे तेथे विविध जैव व मत्स्यसंपदा आढळून येते. येथे गेली अनेक वर्षे मच्छीमार पारंपरिक पद्धतीने मासेमारी करतात. मात्र काही महिन्यांपासून तिवरांच्या परिसरात डांबरसदृश थर साचला आहे. शिवाय किनाऱ्यावर येणारा प्लास्टिकचा कचराही वाढत आहे. त्यामुळे पारंपरिक मासेमारीला धोका निर्माण झाला आहे, असे मच्छीमार बांधवांचे मत आहे.

एडवण, कोरे, दातिवरे येथील समुद्रकिनाऱ्याजवळ दगडांचे बांध बांधून त्याद्वारे किनारी मासेमारी केली जाते. या मासेमारीदरम्यान पसरवलेल्या जाळय़ांमध्ये माशांऐवजी प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या व इतर कचरा अडकतो. त्यामुळे मासेमारी नीटशी होत नाही. येथील प्रदूषण वाढल्याने कांदळवनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. मुळांना प्लास्टिक चिकटल्याने या परिसरातील तिवरे नष्ट होण्याची भीती आहे.

एडवण गावच्या किनाऱ्यावर पालघर तालुक्यातील आशापुरा देवीचे तसेच शंकराचे मंदिरही आहे. हजारो भाविक या ठिकाणी भेट देत असतात. मात्र समुद्रकिनारी पसरलेल्या कचऱ्यामुळे आणि तो कुजल्याने येणाऱ्या दुर्गंधीमुळे भाविकांनाही गैरसोयीला सामोरे जावे लागते. येथे तिवरांवर आलेल्या तेलतवंगामुळे कोळंबट, खेकडे, शिंपल्या, लहान मावरं आदी प्रजातींना धोका निर्माण होतो. दूषित माशांच्या सेवनामुळे माणसालाही अनेक जीवघेणे आजार होऊ शकतात. सागरी प्रदूषणामुळे जलचरांच्या अन्नसाखळीत अडथळा निर्माण होऊन परिणामी सागरी पर्यावरण बिघडत आहे. एडवण समुद्रकिनाऱ्यावरील डांबरसदृश चिकट थरामुळे तसेच किनाऱ्यावर जमा होत असलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे पारंपरिक मासेमारीला धोका निर्माण झाला आहे. प्रशासकीय यंत्रणांनी याविषयी त्वरित योग्य ती कारवाई करावी अशी मागणी एडवण गावातून होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -