विरार : देशभरात सर्वत्र नवरात्र उत्सवाची धूम सुरु असताना मुंबईतून एक दु:खद घटना समोर आली आहे. विरारमध्ये दांडीया खेळताना मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूच्या धक्याने पित्याने आपले प्राण सोडले. मनीषकुमार जैन असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर नरपत जैन असे मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या पित्याचे नाव आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथे राहणारा मनीष नरपत जैन हा रात्रीच्या सुमारास बिल्डिंगच्या आवरात गरबा खेळत होता. यावेळी त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. यावेळी त्याच्या वडिलांनी, तिथे असलेल्या नागरिकांनी त्याला विरारच्या संजीवनी रुग्णालयात नेले. मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू झाल्याचे पाहून त्याचे वडील नरपत जैन यांनाही हृदयविकाराचा झटका आल्याने ते कोसळले. या घटनेत त्यांचाही जागीच मृत्यू झाला. एकाच दिवशी घरातील दोन सदस्यांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
जैन कुटुंबियांचा सोन्याचे दागिने खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. मयत मनीष जैन ज्याचे तीन महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. मनिष वडिलांच्या व्यवसायात मदत करत होता. नरपत जैन यांच विरार जैन समाजामध्ये चांगल प्रस्थ होते. तसेच सोसायटीमध्ये देखील दोघांचही वागणे मनमिळाऊ होते. त्यामुळे दोघांच्या मृत्यूने सोसायटीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. बुलढाण्यात देखील अशीच एक घटना घडली आहे. दांडिया खेळत असताना एकाचा मृत्यू झाला आहे.