उस्मानाबाद : ऑन ड्युटीवर असताना रील्स बनवल्याने एका महिला कंडक्टरला चांगलेच महागात पडले आहे. एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचे सांगत महामंडळाने या महिला कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारातील महिला कंडक्टर टिक टॉक स्टार मंगल सागर गिरी यांना एसटी महामंडळाने अखेर निलंबित केले. मंगल सागर गिरी यांनी कर्तव्यावर असताना रिल्स बनवले त्यामुळे एस टी महामंडळाची बदनामी झाली असा ठपका मंगल सागर गिरी यांच्यावर ठेवला आहे.
त्या इंस्टाग्राम रील्स बनवून शेअर करत होत्या. त्यांचे अनेक व्हिडिओ लोकांनी शेअर केले आहेत. या व्हिडिओला सोशल मीडियात प्रचंड प्रसिद्धी मिळत आहे. त्या महामंडळाच्या गणवेशावर व्हिडिओ शूट करत असून महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांचा व्हिडिओ शूट करणाऱ्या सहकाऱ्यावरही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, अनेकदा कर्मचारी ऑन ड्युटी रील्स शूट करून व्हायरल करत असतात. त्यामुळे कधीकधी ते ट्रोल होतात तर कधीकधी त्यांना सपोर्ट केला जातो. तर या महिला कर्मचाऱ्याला निलंबित केल्यावर अनेक जणांनी संताप व्यक्त करत महामंडळाला धारेवर धरले आहे. गणेशोत्सवादरम्यान पोलिसांनी डान्स केल्यामुळे अनेक लोकांनी त्यावर आक्षेप घेतला होता. तर त्यांना पण जीव आहे, त्यांनी पोलिसांच्या गणवेशात नाचले म्हणून काय झाले असे म्हणत अनेकांनी त्यांच्या बाजूने आपले मत मांडले होते.