कॉंग्रेस पक्षाची सध्याची अवस्था म्हणजे अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करणारा पक्ष अशीच असल्याचे पाहावयास मिळत आहे. एकेकाळी देशातील लोकसभा सभागृहामध्ये आणि अनेक राज्यांतील विधानसभा सभागृहांमध्ये वर्षांनुवर्षे निर्विवाद सत्ता उपभोगणारा पक्ष अशी काँग्रेसची परिस्थिती होती; परंतु मोदी पर्वाच्या केंद्रातील आगमनानंतर काँग्रेसची लोकसभा सभागृहातूनच नाही, तर अनेक राज्यांतील विधानसभा सभागृहातून काँग्रेसची पिछेहाट झालेली आहे. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जेमतेम खासदारांच्या संख्याबळाची पन्नाशी ओलांडताना कमालीची दमछाक झाली होती. २०१९ साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेसला खासदारांची पन्नाशी गाठता न आल्याने लोकसभेतील विरोधी पक्ष नेतेपद गमविण्याची नामुष्की आली. लोकशाही प्रणालीमध्ये सत्ताधाऱ्यांवर अकुंश ठेवण्यासाठी विरोधी पक्षही सक्षम असणे आवश्यक आहे; परंतु मोदी लाटेमध्ये अथवा नरेंद्र मोदी या नावाच्या कर्तृत्वावर सर्वसामान्यांचा विश्वास असल्यामुळे काँग्रेसची पिछेहाट होत गेली. काँग्रेस पक्ष म्हणजे गांधी घराणे ही देशाच्या राजकारणात प्रतिमा निर्माण झालेली असल्याने गांधी घराण्यांवरील रागामुळे म्हणा अथवा देशाचा कारभार चालविताना गांधी घराण्यांकडून झालेल्या चुकांची किंमत काँग्रेस पक्षाला आज मोजावी लागत आहे. अर्थात लोकशाहीमध्ये सत्तेचा, लोकप्रियतेचा, जनाधाराचा ताम्रपट घेऊन कोणी जन्माला आलेला नाही. ओहोटीनंतर भरती आणि भरतीनंतर ओहोटी हा निसर्गाचा नियमच आहे. कोणीही त्याला अपवाद असू शकत नाही. कदाचित आगामी काळात काँग्रेसही मुसंडी मारण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण सध्याची काँग्रेसची अवस्था पाहता लवकर हे चित्र निर्माण होईल याची सुतरामही शक्यता नाही.
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबर रोजी निवडणूक होत आहे. अर्थात या निवडणुकीमुळे देशाच्या राजकारणात उलथापालथ होईल, खळबळ निर्माण होईल, अशातला काही भाग नाही. ही पक्षांतर्गत निवडणूक आहे. या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीत तब्बल दोन दशकांनंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी बिगर गांधी घराण्यातील व्यक्ती विराजमान होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरुर यांच्यात थेट लढत होत आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी के. एन. त्रिपाठी यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरुर यांच्यात थेट लढत होत आहे. सुरुवातीला अध्यक्षपदासाठी २० अर्ज आले होते. अखेरच्या टप्प्यात शशी थरुर, मल्लिकार्जुन खर्गे आणि के. एन. त्रिपाठी अशी तिरंगी लढत अटळ होती; परंतु निर्णायक क्षणी के. एन. त्रिपाठी यांचा अर्ज बाद झाल्याने थरूर आणि खर्गे यांच्यात निर्णायक लढत होणार आहे. एका अनुमोदकाची चुकीची स्वाक्षरी आणि एका अनुमोदकाची दोन वेळा स्वाक्षरी यामुळे उमेदवारी अर्ज बाद झाला. अर्ज माघारीची मुदत ८ ऑक्टोबर आहे. थरुर व खर्गे या दोघांपैकी कोणीही अर्ज माघारी घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने निवडणूक अटळ आहे. दोन दशकांनंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी गांधी घराण्याबाहेरची व्यक्ती विराजमान होणार आहे. यापूर्वी सीताराम केसरी यांनी काँग्रेसच्या खजिनदारपदाची धुरा अनेक वर्षे वाहिलेली होती. गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या माणसाने काँग्रेस अध्यक्षपदी धुरा सांभाळली असली तरी पडद्यामागून त्याही काळात गांधी घराणेच काँग्रेस चालवित असल्याची उपहासात्मक टीका काँग्रेस विरोधकांकडून करण्यात येत होती. काँग्रेस म्हणजेच गांधी घराणे, गांधी घराणे म्हणजेच काँग्रेस अशी समीकरणे गेल्या काही दशकापासून बनली आहेत. पुढील काही वर्षेच ते समीकरण कायम राहणार आहे. मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवार असले तरी गांधी घराण्यांशी वर्षांनुवर्षे एकनिष्ठ असणारे व्यक्तिमत्त्व आहे. थरुर व खर्गे यांच्यात चुरस असली तरी गांधी घराण्याशी जवळीक असणारी मंडळी खर्गेच्याच पाठीशी उभी राहणार, हे निश्चित आहे. थरुर यांनी जाहीर वक्तव्ये करताना प्रचारात आक्रमक राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसला जुने हवे असेल, तर खर्गेंना मत द्या आणि बदल हवा असेल तर मी उभा आहे, पक्षाच्या कामावर समाधानी असाल, तर खर्गेंना मतदान करा. पण तुम्हाला बदल हवा असेल आणि पक्ष वेगळ्या पद्धतीने चालवायचा असेल तर मला निवडा. ही वैचारिक लढाई नाही. काँग्रेस पक्षाच्या संदेशात कोणताही बदल होणार नाही. जी अंतर्गत लोकशाही आम्ही दाखवत आहोत, असे सांगत बदल हवा की जुन्याच पायवाटेवरून जायचे आहे, याचा निर्णय थरुर यांनी सर्वस्वी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर सोपविला आहे.
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण विराजमान होणार अथवा निवडणूक बिनविरोध होणार हे ८ ऑक्टोबरनंतर समजणार असले तरी या निवडणुकीच्या निमित्ताने राजस्थानातील पक्षांतर्गत मतभेदाचा कलगीतुरा उजेडात आला आहे. ‘बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी’ असा प्रकार राजस्थान काँग्रेसच्या बाबतीत घडला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत व राजस्थान काँग्रेसचे युवा नेते सचिन पायलट यांच्यातील वाद जगजाहीर आहे. सचिन पायलट यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा जगजाहीर आहे. अशोक पायलट हे पायलट यांना मुख्यमंत्रीपद देण्यास कोणत्याही परिस्थितीत तयार नाहीत. अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला व जणू काही अध्यक्षपद आपल्यालाच मिळणार अशी धारणाही त्यांची व त्यांच्या समर्थक आमदारांची झाली. आपण अध्यक्ष झाल्यावर मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार व त्यापदी सचिन पायलट हे विराजमान होऊ नये यासाठी हालचाली सुरू झाल्या. गेहलोत समर्थक आमदारांनी राजीनाम्यांचा इशारा दिला. गेहलोत यांनी अध्यक्षपदाचा अर्ज तर भरलाच नाही, उलट या घडामोडीतून थेट काँग्रेसच्या ‘हायकमांड’लाच आव्हान देण्याचा गेहलोत व त्यांच्या समर्थक आमदारांनी प्रयत्न केला. याची किंमत गेहलोत यांना नजीकच्या काळात नक्कीच मोजावी लागणार आहे. काँग्रेसला सध्या मरगळ आलेली आहे. राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ अभियानामुळे पक्षाला काही प्रमाणात संजीवनी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातच अध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे काही प्रमाणात पुन्हा एकवार काँग्रेस पक्ष चर्चेत आला आहे, हेही नसे थोडके.