Monday, July 22, 2024
Homeक्रीडामलेशियाला नमवत भारताचा सलग दुसरा विजय; महिला आशिया चषक

मलेशियाला नमवत भारताचा सलग दुसरा विजय; महिला आशिया चषक

सिल्हेट (वृत्तसंस्था) : सभ्भीनेनी मेघनाचे अर्धशतक आणि शफाली वर्माच्या ४६ धावा या सलामीवीरांच्या दमदार कामगिरीच्या बळावर भारतीय महिला संघाने मलेशियावर मात करत महिला आशिया चषक स्पर्धेत दुसरा विजय मिळवला. पावसामुळे डकवर्थ लुईस मेथडने सामन्याचा निर्णय देण्यात आला.

प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या मलेशियाची सुरुवात निराशाजनक झाली. अवघ्या ६ धावांत त्यांचे २ फलंदाज तंबूत परतले होते. दीप्ती शर्माने पहिल्याच षटकात भारताला बळी मिळवून दिला. त्यानंतर राजेश्वरी गायकवाडने चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मलेशियाला दुसरा धक्का दिला. त्यामुळे अवघ्या ६ धावांत त्यांचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले होते. सहाव्या षटकात पावसाने हजेरी लावली. त्यावेळी मलेशियाच्या धावफलकावर १६ धावा जमल्या होत्या आणि त्यांचे २ फलंदाज माघारी परतले होते. पावसाच्या व्यत्ययामुळे मॅच रेफ्री यांनी डकवर्थ लुईस मेथडने भारताला ३० धावांनी विजयी घोषीत केले. त्यामुळे भारताने सलग दुसरा सामना जिंकत स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.

तत्पूर्वी नाणेफेकीचा कौल जिंकत मलेशियाने प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले. प्रथम फलंदाजी करताना सभ्भीनेनी मेघना आणि शफाली वर्मा या सलामीवीरांनी भारताला अपेक्षित सुरुवात करून दिली. ११ चौकार आणि १ षटकार लगावत सभ्भीनेनी मेघनाने ५३ चेंडूंत ६९ धावांची संघातर्फे सर्वाधिक खेळी खेळली. तिला शफाली वर्माने चांगली साथ दिली. अवघ्या ४ धावांनी शफालीचे अर्धशतक हुकले. तिने ३९ चेंडूंत ४६ धावा तडकावल्या. या जोडीने भारताच्या धावफलकावर बिनबाद शतक झळकावले. विकेट हातात असल्याने वनडाऊन फलंदाजीला आलेल्या रिचा घोषने १९ चेंडूंत नाबाद ३३ धावा फटकावल्या. त्यामुळे भारताच्या धावफलकाचा चांगलीच गती मिळाली. भारतीय फलंदाजांनी मलेशियाच्या दुबळ्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत धावांचा डोंगर उभारला. २० षटकांत भारताने ४ फलंदाजांच्या बदल्यात १८१ धावा उभारल्या. मलेशियाच्या विनिफ्रेड दुराईसिंगमने ३ षटके फेकत २ बळी मिळवले. परंतु तिला धावा रोखण्यात यश आले नाही. नूर दानिया सायहुआडाने केवळ एक षटक फेकत २ विकेट मिळवल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -