अंधेरी पोटनिवडणूक जाहीर; ३ नोव्हेंबरला मतदान, तर ६ नोव्हेंबरला मतमोजणी

मुंबई : मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर ६ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे.


अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार रमेश लटके यांचे १२ मे रोजी दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. आता या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.


सध्या शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. तसेच, राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. याचाच प्रभाव अंधेरीतील पोटनिवडणुकीत पाहायला मिळणार आहे. शिवसेनेतील बंडानंतरची ही पहिली निवडणूक असल्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. अशातच शिवसेनेत दोन गट झाल्यामुळे ही निवडणुक कशी होणार? ठाकरे आणि शिंदे गट कोणत्या निवडणूक चिन्हाचा वापर करणार? यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.


आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा सामना होणार होता. मात्र शिंदे गटाची ही जागा आता भाजपने आपल्याकडे घेतली आहे. पोटनिवडणुकीत भाजप आपला उमेदवार उभा करणार आहे. भाजपतर्फे मुरजी पटेल हे उमेदवार असणार आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत आता शिवसेना उद्धव ठाकरे गट विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे.


२०१९ मधील निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीचे उमेदवार रमेश लटके यांना ४२ टक्के मतं मिळाली होती. तर अपक्ष उमेदवार मुरजी पटेल यांना ३१ टक्के मतं मिळाली होती.


दरम्यान, या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार? पक्षाच्या चिन्हाबाबतची लढाई अद्याप निवडणूक आयोगात सुरु देखील झालेली नाही. केवळ एका बाजूची कागदपत्रं दाखल झाली आहेत. अशावेळी हे चिन्ह नेमकं कोणाला द्यायचं? याचा निर्णय आयोग कसा घेणार, हे पाहावं लागेल. सहसा निवडणूक तोंडावर आली असेल तर आयोग वादात असलेले चिन्ह गोठवून दोन्ही बाजूंना नवीन चिन्ह देत असते. या प्रकरणात केस आयोगासमोर सुरु झालेली नाही, त्यामुळे आमचे चिन्ह आम्हाला राहिले पाहिजे हा शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दावा आयोगात योग्य ठरतो का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

नववर्षाच्या स्वागतापूर्वी रात्री रेस्ट्रोबार, पब आणि मॉल्समध्ये विशेष तपासणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने नववर्षाच्या स्वागत आणि गोवा क्लब तसेच कमला मिल प्रमाणे

मुंबईतील एनएससीआयला अग्निशमन दलाची नोटीस

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाच्यावतीने नववर्ष २०२६ च्या स्वागतासाठी

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांची गळचेपी

मागील ११ वर्षांत मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील ११० हून अधिक मराठी शाळांना टाळे मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई

मुंबईकरांच्या आरोग्याला महापालिका निवडणुकांचा फटका !

मुंबई (प्रतिनिधी) : आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारी दरम्यान, शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर गंभीर

अभासेच्या गीता आणि योगिता गवळी यांनी भरले उमेदवारी अर्ज

दिवसभरात सात जणांनी भरले अर्ज मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने

मुंबई महापालिका निवडणुकीकरता प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण

सोमवार २९ डिसेंबरपासून कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई