Thursday, October 10, 2024
Homeताज्या घडामोडीअंधेरी पोटनिवडणूक जाहीर; ३ नोव्हेंबरला मतदान, तर ६ नोव्हेंबरला मतमोजणी

अंधेरी पोटनिवडणूक जाहीर; ३ नोव्हेंबरला मतदान, तर ६ नोव्हेंबरला मतमोजणी

मुंबई : मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर ६ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार रमेश लटके यांचे १२ मे रोजी दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. आता या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

सध्या शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. तसेच, राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. याचाच प्रभाव अंधेरीतील पोटनिवडणुकीत पाहायला मिळणार आहे. शिवसेनेतील बंडानंतरची ही पहिली निवडणूक असल्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. अशातच शिवसेनेत दोन गट झाल्यामुळे ही निवडणुक कशी होणार? ठाकरे आणि शिंदे गट कोणत्या निवडणूक चिन्हाचा वापर करणार? यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा सामना होणार होता. मात्र शिंदे गटाची ही जागा आता भाजपने आपल्याकडे घेतली आहे. पोटनिवडणुकीत भाजप आपला उमेदवार उभा करणार आहे. भाजपतर्फे मुरजी पटेल हे उमेदवार असणार आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत आता शिवसेना उद्धव ठाकरे गट विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे.

२०१९ मधील निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीचे उमेदवार रमेश लटके यांना ४२ टक्के मतं मिळाली होती. तर अपक्ष उमेदवार मुरजी पटेल यांना ३१ टक्के मतं मिळाली होती.

दरम्यान, या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार? पक्षाच्या चिन्हाबाबतची लढाई अद्याप निवडणूक आयोगात सुरु देखील झालेली नाही. केवळ एका बाजूची कागदपत्रं दाखल झाली आहेत. अशावेळी हे चिन्ह नेमकं कोणाला द्यायचं? याचा निर्णय आयोग कसा घेणार, हे पाहावं लागेल. सहसा निवडणूक तोंडावर आली असेल तर आयोग वादात असलेले चिन्ह गोठवून दोन्ही बाजूंना नवीन चिन्ह देत असते. या प्रकरणात केस आयोगासमोर सुरु झालेली नाही, त्यामुळे आमचे चिन्ह आम्हाला राहिले पाहिजे हा शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दावा आयोगात योग्य ठरतो का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -