कल्याण (वार्ताहर) : टिटवाळा रेल्वे स्थानकात एक्स्प्रेसमधून उतरलेल्या संशयास्पद प्रवाशाला आर पी एफ पोलिसांनी हटकले असता त्याच्याकडील बॅगमध्ये बेहिशेबी ५६ लाख रुपये आणि सव्वा कोटी रुपये किमतीचे सोने आढळले. या प्रकरणी आरपीएफ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
१ ऑक्टोबर रोजी १२५३३ पुष्पक एक्स्प्रेस रात्रीच्या सुमारास टिटवाळा प्लॅटफॉर्मवर गाडी स्लो झाल्याचा फायदा घेत एक व्यक्ती संशयास्पदरित्या खाली उतरली. त्यावेळी रेल्वे आरपीएफचे कर्मचारी हेड कॉन्स्टेबल एल.बी.वाघ आणि एमएसएफ कर्मचारी शुभम खरे यांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले आणि पुढील चौकशीसाठी आरपीएफ टिटवाळा कार्यालय येथे आणले असता रेल्वेच्या आरपीएफ च्या महिला इन्स्पेक्टर टिटवाळा अंजनी बाबर यांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्या व्यक्तीने आपले नाव जीपी मंडल राहणार कामोठे, नवी मुंबई असल्याचे सांगितले.
त्याच्याकडे अधिक माहिती केली असता तो सोन्याचा व्यापार करतो आणि तो लखनौहून आला होता. त्याच्या बॅगमधील सामग्रीबद्दल अधिक चौकशी केली असता, सुरुवातीला त्याने सांगण्यास टाळाटाळ केली मात्र पोलिसांनी आपल्या खाक्या दाखविण्याचे नाटक केले असता त्याने स्वेच्छेने बॅग उघडली आणि त्यातील सामग्री दाखविली. सदरील बॅगेत भारतीय चलनाचे बंडल त्यात ५०० रुपयांच्या ११,२०० नोटा अशी एकूण ५६ लाख रुपये आणि पिवळे धातू आणि पिवळे दागिने प्रमाणित केले आहेत ते सोने एकूण मूल्याचे रु. १,१५,१६,९०३/- (१ कोटी १५ लाख १६ हजार नऊशे तीन रु.) एकूण रोख रक्कम आणि सोने किमतीचा ऐवज असा १,७१,१६,९०३/- (१ कोटी ७१ लाख १६ हजार नऊशे रु.) मुद्दे माल यामध्ये दोन पिवळ्या धातूची बिस्किटे आणि सोन्याचे दागिने होते.
त्याच्याकडे रोख रक्कम किंवा सोन्याची कोणतीही कागदपत्रे नव्हती. त्यामुळे आयकर अधिकाऱ्यांना माहिती देऊन पुढील कारवाईची विनंती केली. त्यानुसार प्राप्तिकर अधिकारी विजय माळवे आणि त्यांचे तीन आयकर निरीक्षक रविवारी आरपीएफ कार्यालय टिटवाळा येथे हजर झाले. साक्षीदार आणि वरील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रोख बंडलांची मोजणी करण्यात आली आणि त्यात ५०० रुपयांच्या ११,२०० नोटा सापडल्या. एकूण ५६ लाख रुपये सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार अधिकृत गोल्ड व्हॅल्युअरने केलेल्या पडताळणीनुसार प्राप्त सोने मुद्दे माल किंमत रु. १ कोटी १५ लाख १६ हजार नऊशे ३ रुपये आणि रोख रक्कम ५६ लक्ष असा तब्बल एकूण १ कोटी ७१ लाख १६ हजार नऊशे ३ रुपयांचा मुद्देमाल सापडला.
हे भारतीय चलन आणि सोन्याच्या अवैध वाहतुकीचे संशयित प्रकरण असल्याने पोलीस निरीक्षक अंजनी बाबर यांनी पुढील तपासासाठी हे प्रकरण आयकर प्राधिकरणाकडे सोपवण्यात आले.