नाशिक (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर व नाशिक रोड परिसरात दुचाकी गाड्यांचे चोरी प्रमाण सातत्याने वाढले आहे. नाशिकरोड पोलिसांनी विविध भागातून चोरलेल्या ६६ दुचाकी संशयितांकडून जप्त करण्यात आल्या आहेत. या मोटारसायकल्सची एकूण किंमत सुमारे सात लाख ७० हजार रुपये असल्याचे सांगण्यात येते.
सदरचे चोरटे हे दुचाकी गाड्या चोरून कमी किंमतीत ग्राहकांना विकत असल्याची गुप्त माहिती नाशिकरोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाची कर्मचारी विशाल पाटील व मनोहर शिंदे यांना समजली. त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना दिली. त्यानंतर पाटील व शिंदे यांनी गुप्त माहितीद्वारे संशयित अतुल नाना पाटील याला सिडको परिसरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची अधिक चौकशी केली असता त्याचे दोन साथीदार प्रवीण रमेश पाटील आणि ऋतिक उत्तम अडसुळे हे दोघे देखील चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे समजल्यानंतर त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, या तिघा संशयितांनी नाशिकरोड, इंदिरानगर, सातपूर, नाशिक, ग्रामीण धुळे, जळगाव या ठिकाणाहून दुचाकी गाडी चोरल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून एकूण १५ गुन्हे उकल झाले आहेत. त्याचप्रमाणे १२ जुलै २०२२ ते आजपर्यंत वेळोवेळी दोन अल्पवयीन मुलांसह व पंधरा संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून २२ लाख वीस हजार रुपये किमतीच्या एकूण ६६ मोटरसायकली जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे आजही अनेक दुचाकी चोरीच्या टोळ्या या शहरात पसरल्याचे यावरून दिसून येते. उल्लेखनीय कामगिरी गुन्हे शोध पथकातील हवालदार अविनाश देवरे सुभाष घेर मन अविनाश झुंजरे विष्णू गोसावी, राकेश बोडके, केतन कोकाटे आदींनी पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे, उपायुक्त विजय खरात त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.
फर्निचर व्यावसायिक सोनवणे यांच्या हत्याकांडाचा उलगडा झाल्यानंतर नाशिक पोलीस ऍक्टिव्ह झाल्याचे दिसून येत आहे. या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असतानाच नाशिकरोड पोलिसांनी पुन्हा उल्लेखनीय कामगिरी करून शहर व परिसरात मोटरसायकल चोरांना अटक केली आहे.