Wednesday, July 24, 2024

साप्ताहिक राशिभविष्य

साप्ताहिक राशिभविष्य, दि. ०२ ते ०८ ऑक्टोबर २०२२

अपेक्षित लाभ होतील
मेष – या सप्ताहात बाहेर कुठे फिरायला जाण्याचा मानस असेल. पण ऑफिसमध्ये जास्त काम असल्यामुळे मनासारखी सुट्टी घालवता येणार नाही. तसेच जेवढे ठरवलेले दिवस सुट्टीचे होते तेवढे मिळणार नाहीत. त्यामुळे मुले नाराज होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना आणि व्यावसायिकांना हा सप्ताह चांगला जाणार आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला निश्चित घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. सोशल मीडियावर जास्त व्यस्त असू नये. अविवाहित तरुणांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे.

मेहनतीचे फळ मिळेल
वृषभ – या सप्ताहात शेअर बाजार, वायदेबाजार तेजी-मंदी इम्पोर्ट एक्सपोर्टमधील व्यक्तींना धनलाभ, आर्थिक प्राप्ती तसेच मोठे सौदे होऊ शकतात. छोट्या-मोठ्या व्यवसाय करणाऱ्यांचा प्रवास होऊ शकतो. घरातील व्यक्तींशी काही वैचारिक मतभेद होऊ शकतात. मन:स्थितीमध्ये बिघाड होऊ शकतो. शांतपणे विचार करून निर्णय घ्या. मन एकाग्र ठेवा. आपण स्वतः सकारात्मक विचाराने राहा. कुठल्याही प्रकारचे टेन्शन, ताण घेऊ नका. अर्थातच आपले मनोबल चांगले ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करालच. सगळे विचारपूर्वक कार्य पूर्ण कराल. मेहनतीचे पूर्ण फळ आपणास मिळेल.
आर्थिक नियोजन नीट करा
मिथुन – आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काही राजकारणाला तोंड द्यावे लागणार आहे. त्याची तयारी असू द्या. आर्थिक गोष्टीमध्ये खूप लक्ष देऊन काम करावयास पाहिजे, आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापन व्यवस्थित असावयास पाहिजे, आर्थिक नियोजन नीट करा तरच आपणास आर्थिक लाभ होतील. कुठल्याही गुंतवणुकीमध्ये विचारपूर्वकच गुंतवणूक करणे आवश्यक आहे. आपल्या घराच्यासंबंधी तसेच मालमत्तेसंबंधी प्रश्न समोर येण्याची शक्यता आहे. पण त्यात आपण पूर्ण विचार करून मार्ग काढाल. विद्यार्थ्यांना नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील. प्रेमिकांना चांगले दिवस आहेत.
मुलांच्या प्रगतीमुळे आनंद
कर्क – सरकारी नोकरी करणाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना इच्छित जागी बदली होण्याची शक्यता आहे. आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सातत्याने काम कराल, पण आपणास खूपच काम असणार आहे. कामाचा ताण येऊ देऊ नका. कामामध्ये अडचणी येण्याची संभावना आहे. आपण आपल्या कुशलतेने अडचणी दूर कराल. वैवाहिक आयुष्यामध्ये विनाकारण ताण येण्याची शक्यता आहे. वादविवादाची शक्यता आहे. वाद-विवाद टोकाला जाऊ देऊ नका. सप्ताहाच्या मध्यवर्तीमध्ये सर्व वातावरण चांगले होणार आहे. मुलांच्या प्रगतीमुळे आनंदी वातावरण तयार होईल.
वैवाहिक जीवनामध्ये मधुरता
सिंह – आपल्या दैनंदिन जीवनावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. खाणेपिणे यामध्ये लक्ष द्या. कोणत्याही प्रकारचे अनियमित जेवण करू नका. प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष देणे जरुरी आहे. नोकरी व्यवसायामध्ये लक्ष देणे आवश्यक आहे. जिथे कुठे वादावादी होऊ शकते, तिथे होऊ देऊ नका. कुटुंबातील वातावरण चांगले असेल. वैवाहिक जीवनामध्ये मधुरता येईल. आपला जोडीदार आपल्याशी सामंजस्याने वागणार आहे. त्यामुळे आपले लक्ष आपल्या कार्यक्षेत्रावर केंद्रित करून आर्थिक लाभ मिळवणे शक्य आहे.
प्रगती करण्याची संधी
कन्या – आपणास या सप्ताहामध्ये आपली प्रगती करण्यासाठी अनेक संधी मिळणार आहेत. या संधीचा आपण फायदा करून घ्या. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारणार आहे. कोणत्याही प्रकारे चांगली संधी हातातून जाऊ देऊ नका. कुटुंबातील वातावरण अतिशय चांगले असणार आहे. आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये खूपच व्यस्त राहणार आहात. खूप काम असल्यामुळे आपल्याला थकवा येऊ शकतो. त्यामुळे प्रकृतीची काळजी घ्या. आपल्या या संवादशैलीमध्ये सुधारणा होणार आहे. त्यामुळे ते एक प्रभावी माध्यम ठरणार आहे.
महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल
तूळ – या सप्ताहामध्ये आपण आपल्या व्यापार व्यवसायातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात यशस्वी होणार आहात. भागीदारीच्या व्यवसायामध्ये भागीदाराबरोबर छोट्या-मोठ्या कारणाने वादावादी होऊन, काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. जे व्यवसायिक इम्पोर्ट-एक्सपोर्टमध्ये आहेत, त्यांना परदेशातून कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही शत्रूंच्या जास्त नादी लागू नका, मानहानीचे प्रसंग येण्याची शक्यता आहे. आपली आर्थिक स्थिती सुधारणार आहे.
आत्मविश्वास वाढेल
वृश्चिक – घरातील वातावरण सुधारणार आहे. घरातून आपल्याला काही सुखद अनुभव येण्याची शक्यता आहे. विचारपूर्वक केलेल्या कार्यामध्ये सहजतेने यश येणार आहे. सर्व कार्य सहजतेने पूर्ण व्हायला लागतील. आपल्यामध्ये आत्मविश्वास भरपूर असणार आहे. नोकरीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना नोकरीमध्ये काही अडचणींना सामना करावा लागणार आहे. पण आपण याच काळात स्वतःला सिद्ध करू शकता. घरामध्ये मोठी खरेदी होऊ शकते. स्वतःच्या व्यापार, व्यवसायासाठी खूप धावपळ करावी लागणार आहे.
बचतीचा फायदा होईल
धनु – आपणास या सप्ताहामध्ये आई-वडिलांचे सहाय्यक मिळणार आहे. या कालावधीमध्ये आपण आपली बचत करू शकता, या बचतीचा आपणास भविष्यामध्ये खूप फायदा होणार आहे. कुठल्याही परिस्थितीत भाग्याच्या भरवशावर बसू नका. आपले काम दुप्पटीने वाढवा. कुटुंबामधील काही महत्त्वाच्या प्रश्नांना मार्ग मिळत नव्हते ते मार्ग आपल्या मुलांमुळे मिळतील, घरातील वातावरण चांगले राहील. महत्त्वाचे प्रश्न सुटतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल, विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.
कार्यक्षेत्रात पुढे जाल
मकर – आपणास वडिलांचा सहयोग मिळणार आहे. आपल्या जीवनामध्ये आपण सकारात्मक विचारांना प्राधान्य द्याल. शेअर मार्केट, स्टॉक मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना नवीन गुंतवणूक करताना पूर्ण अभ्यास करूनच करा. आपली दूरदृष्टी विचार व कुशल योजना यामुळे आपण आपल्या कार्यक्षेत्रात पुढे जात राहाल. आपणास नोकरी बदलण्याचा विचार करत असल्यास आपण तो बदल करू शकता. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मात्र जबाबदारी वाढणार आहे. आपल्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये नूतनीकरण करण्याचा विचार कराल. व्यापार-व्यवसायात गुंतवणूक वाढवावी लागेल.
स्वतःचा विकास होईल
कुंभ – व्यापार-व्यवसायांमध्ये आपण धैर्याने व समजदारीने घेतलेले निर्णय आपल्याला यश मिळवून देणार आहेत. जर आपण नवीन व्यवसाय किंवा परदेशात गुंतवणूक करायचे ठरवले असेल तरी आपणास चांगलेच यश येणार आहे. आपल्या स्वतःच्या कार्यकुशलतेमुळे, आपला स्वतःचा विकास होणार आहे. आपण आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या तऱ्हेने पूर्ण कराल. बहीण-भावामधील वाद संपवून त्यांच्याशी चांगले संबंध होतील. कुटुंबीयांसमवेत आपण धार्मिक यात्रा करण्याचा विचार कराल.
नवीन संधी मिळेल
मीन – पती-पत्नीच्या नात्यामध्ये एक भावनात्मक वळण येईल. दोघं एकमेकांना खूपच समजून घेणार आहात, त्यामुळे जीवनामध्ये आनंद प्राप्त होणार आहे. आपल्या स्वतःच्या कार्यक्षमतेमुळे आणि कष्टामुळे आपल्याला नवीन संधी मिळणार आहेत. नोकरी करणाऱ्यांना नोकरीमध्ये सातत्याने काम केल्याचे फळ चांगलेच मिळणार आहे. आपले काम नीटनेटके केल्यामुळे कामांमध्ये आपले कौतुक होणार आहे. व्यापार-व्यावसायिकांना नवीन व्यवसायासाठी नवीन मार्ग सापडतील. होणारा फायदा आपणास प्रगतीकारक ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -