Sunday, March 23, 2025
Homeमहत्वाची बातमीचांदणी चौकातील वाहतूक ११ तासांनंतर सुरू

चांदणी चौकातील वाहतूक ११ तासांनंतर सुरू

पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील जूना उड्डाणपूल मध्यरात्री १ वाजता तब्बल ६०० किलो स्फोटकांनी पाडण्यात आला. तब्बल ११ तासांनंतर ढिगारा हटवण्याचे काम पूर्ण झाले असून आता चांदणी चौकातून वाहतूकही सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वाहतूकही हळूहळू सुरळीत होत आहे.

पुलाच्या पाडकामामुळे मुंबईहून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक वाकडमार्गे शिवाजी नगर आणि तेथून कात्रज अशी वळवण्यात आली होती. त्यामुळे आज सकाळी या मार्गावर अवजड वाहने प्रचंड असल्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. तसेच, साताऱ्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक नवरे पूलमार्गे वळवण्यात आली होती. या मार्गावरही वाहनांची संख्या वाढल्याने अनेक वाहने रस्त्यावरच वाहतूक कोंडीत अडकले होते. सकाळी या रस्त्यांवर तब्बल 3 किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मात्र, आता चांदणी चौकातील वाहतूक सुरु झाल्याने इतर मार्गांवरील वाहतूक कोंडीही कमी होत आहे.

दरम्यान, मध्यरात्री १ वाजता पूल पाडल्यानंतर रात्रीतूनच सर्व ढिगारा उचलण्यात येईल व सकाळी ८ वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत होईल, असा दावा प्रशासनाने केला होता. मात्र, ढिगारा उचलण्याचे काम सकाळी १० वाजेपर्यंत चालू होते. त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पुलाच्या पाडकामामुळे पुण्यातील वाहतूक पर्यायी मागाने वळवण्यात आली होती. चांदणी चौकातील पुलाचा ढिगारा पूर्णपणे उचलल्यानंतर येथूनही सकाळी ८ वाजेनंतर वाहतूक सुरू होईल, असे प्रशासनाने सांगितले होते. मात्र, ढिगारा हटवण्यास उशीर झाल्याने पुण्यातील वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे पर्यायी मार्गावर वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. विशेषत: पुण्यातील वाकड, खेड, शिवापूर येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. टोलनाक्यावरही वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

नोएडातील प्रसिद्ध ट्विन टॉवर काही क्षणांत जमीनदोस्त करणाऱ्या ईडीफाईस कंपनीकडूनच चांदणी चौकातील उड्डाणपूल पाडण्यात आला. मात्र, हा पूल दोन टप्प्यात पाडण्यात आला. ६०० किलो स्फोटकांनी केवळ अर्धाच पूल पडला. उर्वरित पूल नंतर पोकलेनच्या सहाय्याने पाडण्यात आला. त्यामुळे पूर्ण पूल पाडण्यास व ढिगारा हटवण्याच्या कामाला विलंब झाला. याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुलालगतच रहिवासी इमारती असल्याने एकदमच पूर्ण पूल पाडण्यात आला नाही. पूल पाडण्यात आम्हाला अपयश आले, असे काहीही नाही. सर्व नियोजनानुसार करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -