Monday, July 15, 2024
Homeमनोरंजनप्यार की राह दिखा दुनिया को...

प्यार की राह दिखा दुनिया को…

श्रीनिवास बेलसरे

‘लंबे हाथ’ (१९६०) हा दिग्दर्शक कृष्णा मलिक यांचा बहुधा एकमेव चित्रपट. एका निरपराध व्यक्तीवर लागलेल्या खुनाच्या आरोपातून तिची सुटका करण्यासाठी तिच्या मुलाने केलेल्या प्रयत्नाची ही कहाणी. यातील कलाकारात फक्त मेहमूदच प्रसिद्ध होता. बाकीचे कलाकार – राजन हस्कर, डैसी इराणी, कुमारी नाझ फारच कमी लोकांना माहीत असतील. सिनेमाही फारसा गाजला नाही. मात्र त्यातील एक गाणे खूपच चिंतनशील होते. निदान आजच्या गांधी जयंतीला तरी त्याची आठवण करायलाच हवी. देशाला गांधीजींच्या चिंतनाची गरज तशी कायमच होती. पण अलीकडे अनेकदा वाटते की, कधी नव्हे तेवढी आज त्यांच्या विचारांची, विशेषत: त्यांनी सांगितलेल्या जीवनमूल्यांची अनुपस्थिती सगळ्या जगालाच तीव्रतेने जाणवते आहे.

अचानक काही हुकूमशहा वर आले आहेत. त्यांना आपले म्हणणे कोणतेच नीतीनियम न पाळता जगावर लादायचे आहेत. धर्मांध संघटना जगभर प्रबळ होत असून त्यांना आपल्या देशाचा चेहरामोहराच बदलून टाकायचा आहे. समाजाला अनेक शतके मागे नेऊन ठेवायचे आहे. आधुनिक जगाने स्वीकारलेली उदारमतवादी समाजव्यवस्था नष्ट करून त्याजागी धर्मांध, प्रतिगामी आणि हिंस्त्र समाज निर्माण करायचा आहे. भारतीय संस्कृती तर नष्ट करायचीच आहे. पण अगदी मूलभूत नैतिक तत्त्वेसुद्धा पायदळी तुडवायची त्यांची इच्छा आहे. या पार्श्वभूमीवर रफीसाहेबांनी गायलेले ते गाणे खरोखर अनमोल ठरते.

गीतकार अंजान यांनी मांडलेले गांधीवादी चिंतन या गाण्यात दिसते. रफीसाहेबांचा आवाज आणि जी. एस. कोहली यांचे संगीत यामुळे ते अनेकांना आजही आठवू शकेल. गाण्याचा आशय शांतीचा संदेश आहे आणि संगीत मात्र चक्क लष्करी संचलनासारखे असले तरी गाणे खूप चांगला परिणाम साधते.

कोणताही प्रश्न हा संघर्षाने सुटणार नाही, तर तो हृदयपरिवर्तनानेच सुटेल हा प्रभू येशूचा विचार गांधीजींना खूप प्रिय होता. त्यांनी तो केवळ सांगितला नाही, तर स्वत: आचरणात आणला. जसा प्रभूचा मृत्यू त्याच्या उदात्त मूल्यांमुळे जवळच्या शिष्याकडून झाला, तसाच गांधीजींचा अंतही एका भारतीयाकडूनच झाला. आज जरी गांधीजींचा विचार फारसा लोकप्रिय नसला तरी तटस्थपणे पाहिले, तर त्याचे महत्त्व कुणाही संवेदनशील व्यक्तीला पटू शकते. तो विचार मांडणाऱ्या अंजान यांच्या गाण्याचे शब्द होते –

प्यारकी राह दिखा दुनिया को,
रोके जो नफरतकी आँधी…
तुममे ही कोई गौतम होगा,
तुममे ही कोई होगा गांधी…

अलीकडे तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे विज्ञानाच्या शक्तीचा दाखला देऊन इतर सर्व विषय कसे निरुपयोगी आहेत ते सांगितले जाते. अल्लाउद्दीनच्या दिव्याप्रमाणे माणसासमोर सर्व भौतिक सुखे हात जोडून उभी करणाऱ्या विज्ञानाच्या राक्षसाने सर्व मानवी संस्कृतीलाच जणू पायाखाली घेतले आहे. नैतिक मूल्यांना, न्यायाला, प्रेमाला, विश्वबंधुत्वाच्या भावनेला काहीच महत्त्व नाही असे वातावरण आहे. यावर गीतकार म्हणतात निर्जीव ग्रहांच्या शोध घेण्यापेक्षा ज्या धरणीमातेवर आपण जन्मलो, वाढलो तिचा आपण काय नर्क करून ठेवला आहे ते पाहणे आणि त्यावर उपाय करणे जास्त महत्त्वाचे नाही का? जे जग आपण औद्योगिक प्रदूषणाने वैराण वाळवंट आणि परस्परद्वेषाच्या वातावरणाने उजाड करून टाकले आहे. तिथे पुन्हा प्रेमाचे पाझर जागृत करणे गरजेचे नाही का? चंद्रावर पाणी शोधण्यापेक्षा इथे आपल्या जन्मभूमीवर नंदनवन फुलवणे हेच आपले ध्येय असायला नको का? ती तर आपलीच जबाबदारी आहे.

तुम बदलोगे उल्टी चाले, बिगड़े हुए ज़मानेकी,
तुम लाओगे बहार वापस, इस उजड़े विरानेकी,
देख रहा हैं ख्वाब ज़माना, मुर्दा चाँद सितारोंके…
फिकर करो कुछ तुम दुनियाकी,
बिगड़ी बात बनाने की…
प्यारकी राह दिखा दुनियाको…

अलीकडेच ज्याने लाखो निरपराध लोकांचे बळी घेतले, शहरेच्या शहरे उद्ध्वस्त केली त्या रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर गीतकार अंजान म्हणतात, खरे आव्हान चंद्र आणि मंगळावर स्वारी करून ते प्रदेश जिंकण्याचे नाही, तर इथल्या सिंहासनांचे आणि राजमुकुटांचे संघर्ष मिटवून मानवतेला तोफा, तीर आणि तलवारीपासून वाचवण्याचे आहे!

तुम्हे मुहब्बत करनी होगी भूखे नंगे लाचारोसे,
तुम्हे तो हैं इन्साफ मांगना, जुल्मके ठेकेदारोसे…
तुम्हे मिटाने हैं सार झगडे तख्त और ताजोके,
तुम्हे बचानी हैं दुनिया तोफ, तीर, तलवारोसे!

हे आव्हान सोपे नाही. त्यात बलिदानही द्यावे लागू शकते याची जाणीव अंजान करून देतात. गीतकार समीर सामंत यांनी ‘कट्यार काळजात घुसली’साठी एक जबरदस्त कव्वाली लिहिली होती. त्यात ते म्हणतात, आता ही दुनिया जगण्याच्या लायकीचीच राहिलेली नाही. ‘यार इलाही मेरे यार इलाही’मध्ये ते म्हणतात –

“मैं सोचता हुं जीनेके अब ना
काबील हैं ये दुनिया,
इन्सान तो क्या इसाकी
भी कातील हैं ये दुनिया.”

जग वाईट आहे हे सांगण्यापेक्षा जगाला वाचवण्यासाठी प्रसंगी मृत्यूलाही न घाबरता बलिदानाची तयारी हवी, असा गांधीजींचा संदेश आहे. तोच गीतकारांनी खुबीने या गाण्यात गुंफला आहे –

वादा करो के तुम ना कभी तुफानोंसे घबराओगे,
मेहनत की और सच्चाईकी
ही राह सदा अपनाओगे,
नयी जिंदगी नयी खुशीका,
नया दौर तुम लाओगे,
देकर अपनी जान भी,
तुम एक नया जहाँ बसाओगे…
प्यारकी राह दिखा दुनियाको….

आज प्रसारमाध्यमांवर कितीही टीका झाली तरी त्यांचा समाजावर प्रचंड प्रभाव पडतो हे सत्य आहे. त्यात दुर्दैवी भाग म्हणजे माध्यमे समाजजीवनातील फक्त वाईट, नकारात्मक आणि संघर्षाकडे नेणाऱ्या गोष्टीच समोर आणून आगीत तेल ओतत असतात. त्या पार्श्वभूमीवर असा शांतीचा, मानवतेचा, प्रेमाचा संदेश देणाऱ्या साहित्याची किती गरज आहे ते अशी गाणी ऐकल्यावर तीव्रतेने जाणवत राहते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -