प्रियानी पाटील
गर्भपात म्हटले की सर्वसामान्य प्रश्नचिन्ह उभे राहते? का? कशासाठी? अशी वेळ यावीच का? या प्रश्नातून निर्माण होणारी साशंकता अनेक सामाजिक नजरा खिळवणारी असते.
आई आणि बाळ सुरक्षित राहण्यासाठी जेवढी जास्त काळजी घेता येईल यासाठी प्रयत्न असतात, मात्र सुरक्षित गर्भपातासाठी सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेला निर्णय जो विवाहित आणि अविवाहित महिलांच्या दृष्टीने जरी सुरक्षेचा मानला गेला असला, तरी गर्भातील बाळाचे काय? हा प्रश्न अनुत्तरित करून जातो. २४ आठवड्यांपर्यंत बाळाची वाढ झाल्यानंतर गर्भपात करणे म्हणजे काळजावर दगड ठेवण्यासारखेच आहे.
अविवाहित महिलेने बाळाला जन्म देणे हे समाजमान्य समजले जात नाही. शिवाय अशा प्रकारे जर बाळाचा जन्म झाला, तर त्याला हक्काचा आसरा मिळत नाही. म्हणजे कुठेतरी मग अनाथ आश्रम किंवा तेही नाही मिळाले, तर त्या बाळाला कुठेतरी फेकून दिले जाते. त्याचे जीवन निरर्थक ठरते. आई म्हणून त्या स्त्रीला समाज स्वीकारत नाही. अशा वेळी तोंड लपवून तिला राहावे लागते. कधी कधी घरातील माणसे, आप्तेष्ट तिच्याशी संबंधही तोडतात. तिला हीन वागणूक दिली जाते. शिवाय आपल्या पोटात वाढणाऱ्या बाळाला आपण ते जन्मापूर्वीच मारलं याचं शल्य तिला लागून राहतं ते वेगळं. जेथे मान्यता नाही तेथे न्यायालयाच्या निकालाने निर्माण केलेला प्रश्न हा असहाय महिलांसाठी एक मार्ग, तोडगा ठरू शकतो. सहा महिने बाळाची वाढ झाल्यानंतर गर्भपात करण्यास सहसा डॉक्टरही धजावत नसतील. कारण गरोदरपणामध्ये २४ आठवड्यांचा कालावधी म्हणजे गर्भातील बाळाला सहा महिने होतात. या सहा महिन्यांत पोटातील गर्भाच्या आकारात वाढ झालेली असते. या कालावधीत बाळाची हालचाल स्पष्टपणे जाणवू लागलेली असते. आईला बाळाचे बेबी किक्स जाणवू लागलेले असतात. शक्यतो १० वेळा बाळाची हालचाल आईला जाणवते. बाळाच्या पूर्ण वाढीसाठी जेमतेम तीन महिने उरले असताना, पूर्णत्वास येऊ पाहणारा जीव शरीराने आकारास येत असताना, हालचालीने आपल्या अस्तित्वाची चाहूल देत असताना, गर्भपात करण्यास कोणत्या मातेचे मन धजावेल?
जिथे मूल नको आहे, तेथे कसली अाली सुरक्षिततेची जाणीव? सहा महिने गर्भात बाळ वाढवून गर्भपात करण्यासाठी सुरक्षिततेची जाणीव मातेच्या दृष्टीने न्यायालयाला योग्य वाटते हे जरी खरे असले तरी, गर्भातील बाळाचा विचार करून भविष्यात त्या मातेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बाळाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही विचार व्हायला हवा हे देखील तितकेच खरे आहे.
गर्भपात म्हणजे, जीवनाचा एक टप्पा विचार करायला लावणारा असतो. का, कशासाठी हे प्रश्न असले तरी त्याची अनेक कारणं असू शकतात? जिथे निर्णयाला माणसं चुकतात, समाजाला घाबरतात, तिथे असे प्रसंग उद्भवतात. मुलगी नको असणे, अनैतिक संबंधातून, घरगुती प्रॉब्लेम्स, स्वत:चे घर नसणे, आर्थिक प्रॉब्लेम, एखादा अपघात अशा अनेक गोष्टी असतात, ज्या गर्भपाताला कारणीभूत ठरू शकतात. मात्र त्याचा कालावधी हा जास्त लांबल्यासारखा वाटतो. काही बाळांचा जन्म हा सातव्या महिन्यातही होतो. अर्थातच सहाव्या महिन्यांत बाळ हे पूर्ण वाढीच्या दिशेने आकाराला येत असते.
जिथे पर्याय नाही तेथे न्यायालयाचा हा निर्णय उपयुक्तच मानावा लागेल. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायद्यांतर्गत एका सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायलायाने विवाहित आणि अविवाहित महिलांना सुरक्षित गर्भपाताचा अधिकार दिला आहे. गर्भपातासाठी २४ आठवड्यांची मुदत पाहता, हा निर्णय महिलांच्या दृष्टीने पूर्ण विचारांती असला तरी सहा महिने वाढ झालेल्या त्या गर्भातील बाळाच्या सुरक्षिततेचे काय? हा प्रश्न अनुत्तरितच ठरतो.