Thursday, October 3, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यचला करूया लोककलांचा जागर

चला करूया लोककलांचा जागर

अनघा निकम-मगदूम

कोकणाला देवभूमी समजले जाते, कारण हा भूभाग अनेक गुण-वैशिष्ट्यांनी समृद्ध आहे. निसर्गाने या भूमीवर विशेष लक्ष दिले आहेच. त्याचवेळी समृद्ध परंपरासुद्धा कोकणच्या मातीत रुजली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक भागात, गावात परंपरेची रूपे, पद्धती वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकाची स्वतंत्र ओळख आहे. इथला जसा आंबा, काजू मासळी महत्त्वाची, इथली जशी वनभूमी महत्वाची, वैशिष्ट्यपूर्ण महत्त्वाचे तसेच इथे या भूभागावर राहणाऱ्या लोकांमध्येसुद्धा अनेक कलागुण आहेत. या भूमीने संपूर्ण राज्याला आणि देशाला अनेक कलावंत, लेखक, गीतकार, अभिनेते, यांच्यापासून विचारवंत, थोर स्वातंत्र्यसैनिक, नेते दिले आहेत. त्यांनी त्यांच्या काळात या देशाचे भविष्य बदलून इतिहासात अढळ स्थान निर्माण केले आहे.

या मातीतून, इथल्या हवेतूनसुद्धा नवनिर्मिती, कलागुणांचा सुगंध पसरत असतो. माणसांची वेशभूषा, राहणीमान, बोलीभाषा इथे गावागाणिक बदलताना दिसते आहे. हेच कोकणचे वैशिष्ट आहे. याची कोकणात लोककलांची मोठी परंपरा आहे. त्याला सामाजिक अधिष्ठान आहे. इथला दशावतार, नमन, खेळे, भजन, कीर्तन, जाखडी या लोककला समाज बांधणीचे मोठे काम करत आल्या आहेत. सामाजिक सुधारणांमध्ये, स्वातंत्र्य चळवळीमध्ये या कलांनी आणि त्याच्या कलाकारांनी मोठी भूमिका बजावली आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासूनच सामाजिक अभिसरणात या कला आघाडीवर होत्या. यामुळे समाज एकसंध होता.

मात्र, हळूहळू या लोककला लुप्त होतात की काय, असे चित्र दिसू लागले आहे. अर्थात बदल होणं निसर्गाचा नियम आहे. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक परिस्थिती बदलत असते, आजूबाजूच्या बदलाचा परिणाम एकमेकांवर होत असतोच. तसाच परिणाम या लोककलांमध्ये झालेला दिसून येतो. त्याचं तंत्र, सादरीकरण याची पद्धत आधुनिक होऊ लागली आहे. टीव्ही, मोबाइलच्या जमान्यात या लोककला सादर होण्याचे प्रमाणही कमी होताना दिसत आहे. नवी पिढी या इडियट बॉक्समध्ये अडकू लागल्यापासून परंपरा जपणाऱ्या या लोककला त्यांच्यासाठी ओल्ड फॅशन झाल्या आहेत. मात्र ‘जुनं ते सोनं’ या उक्तीप्रमाणे या लोककलांचा जागर होणं याची खरी गरज आता निर्माण झाली आहे, असं वाटतं.

आज वेगाने भौतिक बदल होत आहेत. कष्टापेक्षा सुखवस्तू आयुष्य जगण्याकडे माणसाचा कल वाढू लागला आहे. त्यातून केवळ शारीरिक, मानसिकच नव्हे तर सामाजिक बदलसुद्धा घडू लागले आहेत. मनुष्य स्वयंकेंद्रित झाला आहे. मी आणि माझं कुटुंब किंवा मी आणि माझ्या फायद्यापुरते इतकाच विचार होऊ लागला आहे. त्यातून सामाजिक भिंती उभ्या राहत आहेत. अनेक चुकीच्या गोष्टी, प्रथा, पद्धती, लाइफस्टाइल रुजू लागल्या आहेत. एकमेकांबद्दलची माणुसकीची भावना लुप्त होऊन स्वार्थी जीवनाकडे मनुष्यचा कल वाढतोय. आपण सुधारतो आहोत, आपण प्रगती करतो आहोत, औद्योगिक वैज्ञानिक क्षेत्रामध्ये अग्रेसर होतो आहोत. पण एकमेकांपासून मात्र दूर होत आहोत आणि हा बदल चिंताजनक आहे.

अशा वेळेलाच या लोककलांच्या माध्यमातून समाज सुधारणा होणे आणि समाज एकत्र येणं यासाठी खूप महत्त्वाची भूमिका या लोककला नक्कीच बजावतील, असं वाटतं. आजही या भूमीमध्ये अनेक कलावंत आहेत. त्यांच्या कलांना स्थान मिळेल, त्यांना संधी मिळेलच. त्याचवेळी या लोककलांमधून सामाजिक बांधिलकी जपली जाईल. समाजामध्ये एकोपा निर्माण होईल. यासाठीच या लोककलांचा पुन्हा एकदा नव्याने जागर करण्याची गरज निर्माण झाली आहे आणि यासाठी सरकारनेसुद्धा पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.

केवळ अन्न, पैसाच नव्हे, तर कला मनुष्याला जगण्यासाठी महत्त्वाची आहे. हे प्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांनीही सांगितले आहेच. त्यामुळे जगण्याला अर्थ निर्माण करून देणाऱ्या या लोककला जीवनामध्ये जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलतील, यात वाद नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -