माधवी घारपुरे
जगभरातील सर्वांच्या कैफियती मी या कानांनी रात्रंदिवस ऐकत असतो. इच्छा असो वा नसो, मला त्या ऐकाव्याच लागतात. कारण मला नेमून दिलेले काम कुरकुर न करता, कोणत्याही फळाची अपेक्षा न धरता करणे यालाच ‘कर्मयोग’ म्हणतात. तो कर्मयोग मी जगतो. पण जो साऱ्यांच्या कैफियती ऐकतो, त्यालाही कधी काही सांगायचे असेल, असे तुमच्या मनात एकदा तरी आले का? श्रोते हो, ‘तुमच्या मनात एकदा तरी आलं का? मला काही सांगायचं आहे.’ पण माझे ऐकून घ्यायला तुमचे कान तयार आहेत? तुम्हाला वेळ आहे? तुम्ही म्हणाल, कानाचं काय ऐकायचं? आमचं म्हणणं त्यानं ऐकणं हे फक्त त्याचे कार्य. पण तसं नाही. क्षुद्रातीक्षुद्र प्राण्यालासुद्धा मन आहे. वस्तूला मन आहे. वाणी आहे. सुकलेले फुल असो नाहीतर पाण्याचा थेंब असो, नाहीत किडा मुंगी असो.
मित्रांनो, आजकाल माझे कान विटून गेलेत. पण मला संपावरही जाता येत नाही. जावं जिकडे तिकडे आवाजच आवाज. आज काय गणेशभक्त, उद्या काय देवीभक्त, परवा दहीहंडी, कधी दिवाळी, कधी नववर्ष, कधी नेत्यांचा वाढदिवस. जोरजोरात संगीत (?) लावायचे. स्पीकर जवळून जाताना छाती धडधडते. माझ्या पूर्वंजांनी म्हणे, भास्करबुवा बखले, बालगंधर्व यांचे संगीत ऐकले म्हणे. ते भाग्य आमच्या नशिबी नाही. आताचे सुमधूर संगीत ऐकून कानाचे दगड झालेत रे दगड.
दुसरे कान विटले ते दूरदर्शनवरचे संवाद आणि चर्चेच्या नावाखाली चाललेली भांडणे ऐकून. विंदाच्या भाषेत भाषेत बोलायचे, तर ‘तेच ते आणि तेच ते’. कुठे सासूने कट रचल्याचे संवाद, तर कुठे सुनेने कट रचल्याचे संवाद. कपट कारस्थानांशिवाय आणि विवाहबाह्य संबंधाशिवाय विषय नाही.
तिसरा रेडिओ. या लोकांच्या मानाने खूपच चांगला. पण त्यालाच घरातून हद्दपार करून टाकताय. शंभरात एखाद्याच्या घरी त्या बिचाऱ्याला स्थान आहे, पण ते ज्येष्ठांपुरतेच.
माणसं, मुलं रस्त्यातून फिरताना तरी मला वाटले होते की, मी शांत असेन. पण प्रत्येकाच्या कानात बुच. बुचांशिवाय मुलं, मुली दिसतच नाहीत. बस असो, ट्रेन असो किंवा जिम असो, झुंबा असो. गप्पा मारत, हसत खिदळत, नवीन काही वाचलेले सांगत जाताना मुलं-मुली दिसतच नाहीत. काय ऐकत असतात. त्या भगवंतालाच माहीत.
We are always busy हे दाखविण्याचे तंत्र नसेल? कारण ना कवितेच्या दोन ओळी साठवणार ना कॅलक्युलेटर शिवाय दोन हिशोब सांगता येणार.
घरी आल्यावर आईशी दोन सुख-दु:खाच्या गोष्टी बोलतील. त्या ऐकेन असे वाटत असताना ‘मी बोअर झालोय, आता काही विचारू नकोस’ सांगून कानाला मोबाइल लागलाच म्हणून समजा. मात्र प्रत्येकाला छंद आहे. एकांतात तरी नवरा-बायकोचे गोड प्रेमाचे शब्द ऐकू येतील म्हणावे, तर कधी याचा मूड नाही, कधी त्याचा मूड नाही. लॅपटॉपवर टकटक करायला सुरुवात.
तुम्ही हसाल, पण अलीकडे कथा, किर्तन, भारुड, प्रवचन ऐकायला मिळत नाही. आरती, गोंधळ, जोहार आणि ‘काकडा’ तो तर नाहीच बिचारा. परवाच एकजण म्हणाला, काकडी माहीत आहे. काकडा म्हणजे मोठी काकडी. ते पुल्लिंग. स्टोव्हचा काकडही कुणाला माहीत नाही, मग देवाचा काकडा कुठला कळणार? ना भूपाळी कानी पडत ना संध्येची २४ नावं. आचमन घेतल्याचे आवाज येतात, पण ती विदेशी आचमणं बरं!
कित्येक दिवस मी वाट बघतोय की, बायकांच्या बोटातील जोडव्यांचा टकटक आवाज येईल. तो आवाजच मला खूप भावतो. किणकिणऱ्या पैंजणांचा स्वर गाण्यातच ऐकतो मी. कवींनी मात्र मला, माझे मित्र असणारे डोळे यांना स्थान दिलंय. रानात सांग, कानांत आपुलेे नाते, मी उद्या पहाटे येते’ किंवा ‘साद तुझी ती कानी पडता, हरखून मी रे मागे बघता’.
रेडिओवर ऐकलं की, मी अजून शहारून जातो. साहित्यातही माझ्याशिवाय अडतच. म्हणून तर लिहितात –
कानामागून आली अन् तिखट झाली.
बातमी या कानाची त्या कानाला कळू
दिली नाही.
हलक्या कानांपासून दूर राहाणं चांगलं.
भिंतीलाही कान असतात बरं!
सोनाराने कान टोचले की तेच बरं! आणखी.
‘सोनाराने कान टोचले’ यावरून आठवलं, बरं झालं, मित्रांनो, मी आजकाल शारीरिक थकलोय रे! कारण या बायकांनी मला भोकं पाडून पाडून बेजार केलंय. पूर्वी एक कानाच्या पाळीला आणि वर बुगडीला दोनच भोकं होती. पण आता बाळीपासून वरपर्यंत ५/५ भोकं पाडून चाळण झाली आहे माझी. कोणत्याही कुशीवर झोपा, झोप लागत नाही. त्या मात्रा ढाराढूर झोपलेल्या. माझा
आवाज ऐकतो कोण?
मला वाईट वाटले, पण दु:ख क्षणकाळच टिकतात, याचा प्रत्यय आला. शिवाय आता त्या मुलींमध्ये स्पर्धांच स्पर्धा. कानात कुडी गोड दिसायची. आता कानाला म्हणजे मला पेलतं की नाही. हा विचारच नाही. अभिनेत्री घालतात म्हणून द्या. पण अशी कानातील घालतात की, आकार, वजन याचा मेळच नाही. यांची फॅशन म्हण. एक बरंय गळा सुटतो अशा वेळी. कारण कानात खूप मोठं घातलं की, गळा रिकामा ठेवायचा म्हणे. मी काही बोललं, तर म्हणतील, पांडुरंगाने नाही का मोठी ‘मकर कुंडले’ घातली? पण बाबांनो त्यामागे त्यांची भूमिका वेगळी आहे.
अरे बाबांनो, शेवटी सांगतो की, मी तुमच्या पंचेद्रियातील मोठी शक्ती आहे. भगवद्-मार्ग असो वा ज्ञानमार्ग असो, वाटेतला लख्ख उजेड आहे मी. तुम्ही आणि ज्ञान यांना जोडणारा साकव आहे मी. जे पाहता, श्रवण करता तसेच तुम्ही घडणार आहात… कान श्रवणभक्तीसाठीच आहेत.
कान (श्रवण) असेल, तर मान आहे.
कान असेल तर शान आहे.
कान असेल तर भान आहे.
बस, इथेच थांबतो, कारण सुज्ञासी अधिक काय सांगावे?
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र कृतिका. योग सौभाग्य. चंद्र राशी…
जयपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४७व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर ८ विकेट राखत…
मच्छिमारांच्या घरांसाठी केंद्राने भूमिका घ्यावी - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्योत्पादनाचा…
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मोलाचा सल्ला मुंबई : सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे,…
पुणे : हवाई प्रवास करताना योग्य दरात आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने पुणे…
फ्रांन्सशी झाला ६४ हजार कोटी रुपयांचा करार नवी दिल्ली: भारत सरकार नौदलासाठी 26 राफेल मरीन…