डॉ. वीणा खाडिलकर
संतसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक ज्येष्ठ भारुडकर, कीर्तनकार, प्रवचनकार, साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे यांचे दि. २६ सप्टेंबर २०२२ रोजी देहावसान झाले. त्यानिमित्त…
डॉ. रामचंद्र अनंत देखणे अनंतात विलीन! हे शब्द कानी पडले व नेत्रात साठवलेले काकांचे अनेक क्षण मनात तरळू लागले आणि मन हळहळले…
‘दार उघड बये दार उघड’ म्हणणाऱ्या विद्वान भारुडकारास जणू बयेने घटस्थापनेच्या दिनी देवी आराधानेसमयी अलगद कुशीत घेतले. साक्षात आदिमाया आपल्या लाडक्या लेकराला भेटून
धन्य झाली.
तुकोबा म्हणतात ना,
ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभा वीण प्रीती ।
या प्रमाणानुसार देवीआईने आर्त हाक ऐकली व आपल्या लेकरास घेऊन गेली.
साक्षात सरस्वती ज्यांच्या जिव्हेवर वास करीत असे, असे डॉ. रामचंद्र देखणे आम्हा सर्व कीर्तनकारांचे प्रेरणास्थान…! खरे तर वारकरी संप्रदायाचे पाईक पण नारदीय कीर्तनकारांप्रति तितकीच आस्था बाळगणारे… साक्षात नारदांनी भगवंताचे गुणगान करावे तसे संतसाहित्याचे गुणगान करणाऱ्या देखणे काकांची संपूर्ण
साहित्य संपदा गुणीजनांना कायम मार्गदर्शनच करेल.
माझे वडील राष्ट्रीय कीर्तनकार हभप नरहरी अपामार्जने यांच्या जाण्याने कीर्तन क्षेत्रात पोकळी निर्माण झाली असताना ही दुःखद बातमी कानी आली. आध्यात्मिक क्षेत्रातील एक एक पान गळत चाललेले पाहून मन विदीर्ण झाले.
देखणे काकांच्या घराण्याला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. बालपणापासूनच साहित्यनिर्मिती करणारे बाल रामचंद्र वडिलांच्या कीर्तनात टाळकरी म्हणून उभे राहत आणि बुलंद आवाजात अभंग गात. बालपणीच पित्याकडून भारुड कीर्तनाचे बाळकडू त्यांना प्राप्त झाले. ज्ञानार्थीबालक रामचंद्र हळूहळू एक एक पाऊल मार्गक्रमण करीत ज्ञानवंत, कीर्तवंत होऊ लागले. संत साहित्याचा अभ्यास करता करता स्वतः रामचंद्रांनी बघता बघता साहित्य निर्मितीत कळस गाठला! डॉ. रामचंद्र देखणे भागवतधर्माची देखणी पताका सातासमुद्रापार घेऊन गेले!
भारुडाचा अर्थ जाणता जाणता त्याचा गर्भितार्थ शोधण्याची त्यांची जिज्ञासा बळावली. त्यांनी संशोधक जिज्ञासू वृत्तीने ‘भारुड वाङ्मयातील तत्त्वज्ञान’ या अंतर्गत संत एकनाथांच्या भारुडांचे सखोल अध्ययन केले आणि प्रबंध निर्मितीचे मौलिक कार्य केले आणि पुणे विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी (पीएच.डी.)
प्राप्त केली!
त्यांची अनेक पुस्तके मला व सर्व कीर्तनकार, भारुडकार व साहित्यिकांना सदैव साद घालत राहतील. असे म्हणतात ना,
जो आवडतो सर्वांना । तोचि आवडे देवीला ।।
हो हो देवीलाच… म्हटले मी!!
दार उघड बये, दार उघड!! असा देवीचा जागर करणारा बहुरंगी भारूडकार अचानक संपूर्ण अध्यात्म आणि साहित्य क्षेत्र पोरके करून गेला। संपूर्ण आध्यात्मिक समाज हळहळला! पण यांनीच एका लेखात माऊलीच्या ओवीतील जन्म, मृत्यूबद्दल शाश्वत सत्य कथित केले होते ते मला आठवले.
माऊली महावैष्णव ज्ञानोबा म्हणतात…
तैसे येणेची शरीरे।
शरीरा येणे सरे।
किंबहुना येरझारे। चिरा पडे।
आमचे देखणे काका ही ओवि सहजपणे उलगडत. माझ्या बालपणी माझ्या बाल मनाला समजेल, उमजेल अशा पद्धतीने या ओवीतील जीवन रहस्य आणि शाश्वत सत्यच मला ते सांगून गेलेत.
याच ओवीचा अर्थ एका हिंदी चित्रपट गीतात कसा सामावला आहे, हे माझे वडील काकांना ते गीत गाऊन सांगू लागले. बाबांच्या गाण्यावर काकांनी ताल धरला आणि नकळतच दोघेही त्या हिंदी गीतावर ठेका धरत वारकरी पद्धतीने नाचू लागले व गाऊ लागले…
जिंदगी एक सफर है सुहाना, यहा कल क्या हो किसने जाना!
मौत आनी हैं आयेगी एक दिन
जान जानी हैं जायेगी एक दिन।
ऐसी बातों से क्या घाबराना।।
त्यावर देखणे काका उत्स्फूर्तपणे
गाऊ लागले…
जन्म-मरण नको, आता नको येर झार। नको ऐहिकाचा नाथा
व्यर्थ बडीवार।
कैवल्याच्या चांदण्याला
भुकेला चकोर।।
अशी प्रेमाची दोन विद्वान विद्यापीठे म्हणजे माझे बाबा दिवंगत प्राचार्य न. चिं.अपामार्जने व प्रकांड पंडित, संतसाहित्याचे गाढे अभ्यासक दिवंगत डॉ. रामचंद्र अनंत देखणे…!!
बाबा आणि देखणे काका यांना एकत्र अनुभवणे म्हणजे आमच्यासारख्या अज्ञानी विद्यार्थ्यांसाठी ज्ञान सागरात डुंबण्याची सुवर्ण संधीच! एकीकडे संस्कृत पंडित असणाऱ्या बाबांची श्लोक मालिका सुरू, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून देखणे काकांचं देखणं भारुड… कधीच संपू नये अशी ही जुगलबंदी आता नियतीने संपवली…!!
एका कीर्तन संमेलनात परकर पोलक्यातील वीणा बाबांच्या कीर्तनात टाळ वाजवते व सुंदर आवाजात गाते हे पाहून बाबांना काका म्हणाले, ‘अप्पा, अहो या वीणेला बोलकी करा व नारदाच्या गादीवर उभी करा. वीणा नारदाच्या गळ्यात शोभते!’
डॉ. रामचंद्र देखणे म्हणजे संतसाहित्य आणि परंपरेचे जणू चालते बोलते विद्यापीठच!
पुंडलिकापाशी। नामा उभा कीर्तनासी।
येऊनिया पांडुरंगे । स्वये टाळ धरी अंगे।।
या संत जनाबाईच्या पंक्तीनुसार काकांनी देहभान विसरून भारूड गायले की सर्वं प्रेक्षक जणू विठ्ठलमय होऊन ब्रम्हानंदात ताल धरून डोलू लागायचे…!
कीर्तनात भारुड कसे गायचे, ताल कसा धरायचा, हावभाव कसे करायचे हे ते सहजरीत्या शिकवत आणि शिकवता शिकवता हे भारुडाचे कुलगुरू अनेकवेळा भान हरपून ब्रम्हानंदात नाचू लागत!!
आनंदाचे डोही आनंद तरंग ।
अनेक कीर्तन संमेलनांमध्ये देखणे काकांच्या भेटीचा सुवर्ण योग घडून आला. म्हणतात ना,
सुसंगती सदा घडो।
सृजन वाक्य कानी पडो।
प्रत्येक भेटीत काकांचे एखादे पुस्तक काका आम्हास भेट द्यायचे. अशा अनेक ‘साठवणीच्या आठवणी’ हृदयाच्या कप्प्यात मी जपून
ठेवल्या आहेत!
काकांचे साहित्य माझ्या मनाला कायमच भावून गेले.
बहुरूपी भारुडकार म्हणून त्यांनी आजपर्यंत कथा कादंबरी, बालसाहित्य, संतसाहित्य, चिंतनात्मक संशोधनात्मक साहित्य अशा साहित्याच्या विविध प्रकारांमधून तब्बल ४५ ग्रंथांची निर्मिती केली आहे! त्यामध्ये मला भावलेले साहित्य म्हणजे, ‘साठवणीच्या आठवणी’ मनाला वाचनाची आवड लावून गेला.
‘आषाढी’ ‘दिंडी’ ‘ज्ञानदीप लावू जगी।’ ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ इत्यादी त्यांचे संतसाहित्य जीवनात आनंद आणि प्रेरणा देणारे आहे।
तसेच ‘बहुरूपी महाराष्ट्र’ ‘बहुरूपी भारूड’ इत्यादी लोक साहित्य मनाचे रंजन करत डोळ्यांत अंजन घालून भारुडकारास मार्गदर्शक ठरणारे आहे.
डॉ. रामचंद्र अनंत देखणे यांच्या जीवन प्रवासात त्यांना अनेक सन्मान, बहुमान, मानाची पदे प्राप्त झाली आहेत. देश-विदेशातील दौरे, अमेरिकेतील विश्वासाहित्य संमेलनातील ‘संतसाहित्य व आधुनिकता’ या विषयावर व्याख्यान देऊन त्यांनी अमेरिकेत जन्मलेल्या मराठी तरुण पिढीस संतसाहित्याचे खूप सुंदर मार्गदर्शन करून आकर्षित केले. माऊली ज्ञानोबा म्हणतात,
जे ज्ञान पै गा बरवे।
जरी मनीं आधी आणावे ।
तै संता या भजावे ।
सर्वस्वे परी।
तरुणांनी ज्ञानी होण्यासाठी संतांची कास धरावी, हा मोलाचा संदेश देणारे, अविरत सकल संतांचे प्रगाढ अध्ययन करून आपणास पुस्तकरूपी वारसा देणारे डॉ. रामचंद्र देखणे महाराष्ट्राच्या हृदयात
चिरकाल राहतील…!!ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,
अधीक ‘देखणे’ तरी निरंजन पाहणे।
योगीराज विनवणे मना आले वो माये।।
डॉ. रामचंद्र देखणे यांस सर्वं वाचकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आणि मानवंदना!!