इंडोनेशिया : इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या गोंधळ आणि हिंसाचारात १२७ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात दोन पोलिसांचाही समावेश आहे.
अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाया यांच्यात झालेल्या या सामन्यात अरेमाचा संघ पराभूत होताच, त्याच्या हताश समर्थकांनी मैदानावर गोंधळ घातला. स्टेडियममधील चेंगराचेंगरी रोखण्यासाठी पोलीस पुढे आले. मात्र, त्यांनाही ते थांबवता आले नाही. स्टेडियममध्येच डझनभर लोकांचा मृत्यू झाला. उर्वरितांना रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्यांचा मृत्यू झाला.
रिपोर्टनुसार, ही घटना पूर्व जावाच्या मलंग भागातील कंजुरुहान स्टेडियममध्ये घडली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक व्हिडिओंमध्ये लोकांनी सीमा ओलांडून पळून जाण्याचाही प्रयत्न केल्याचे दिसून येते. स्टेडियममध्ये झालेल्या गोंधळानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापर केला. स्टेडियममधील गोंधळ काही वेळात थांबला, पण संतप्त लोक रस्त्यावर आले आहेत. हिंसाचाराच्या विविध घटनांमध्ये २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.