रमेश तांबे
एकदा काय झालं चांदोबा बसला रुसून. आकाशात कुठेतरी लांब गेला पळून. मग काय सगळीकडे एकच गोंधळ उडाला. काळ्याकुट्ट अंधारात चांदोबा कुठे गेला? सगळ्यांच्या समोर मोठा प्रश्न पडला. जो तो डोक्याला हात लावून बसला. रात्रीच्या वेळेला प्रकाश कोण देणार? कामं रात्रीची आता कशी होणार? मग सगळेजण सूर्याकडे एकटक पाहू लागले. तसा सूर्य म्हणाला…
दिवसभर मी आणि रात्रीही मीच
दोन दोन कामे मला
नाही जमणार,
कुठे गेला चंद्र, शोधा
तुम्ही त्याला
त्याशिवाय मी काम
नाही करणार…
मग चांदण्यांचे पोलीस गेले चंद्राला शोधायला. पण पहाट होता होता सगळे गेले झोपायला. सूर्याला सर्वांचा राग आला भारी, दिवसभर आग ओकीत फिरली स्वारी. पण सूर्याला चंद्र काही दिसलाच नाही. रात्र होताच आला घरी तोही!
मग ग्रह, तारे चांदण्यांची भरली मोठी सभा. खूप खूप विचार केला तरी प्रश्न नाही सुटला. तेवढ्यात चांदोबाच हजर झाला सभेत. “माफ करा” म्हणाला हात उंचावून हवेत! “यापुढे कधीच जाणार नाही पळून. पण एक दिवस सुट्टी द्या मला ठरवून!”
चांदोबाचे बोलणे ऐकून सभेत मोठा गोंधळ झाला. एका सुरात सारे ओरडले, “का? का? का? सुट्टी हवी तुला! आकाशातल्या लोकांना कधीच नसते सुट्टी, कुणासोबत त्यांनी घ्यायची नसते कट्टी!” खूप गोंधळ झाला, हमरी तुमरी झाली. कोण म्हणाले, “सुट्टी द्या!” कोण म्हणाले “नाही!”
गोंधळातच तिथे मतदान पार पडले. चांदोबाच्या सुट्टीला खूप नकार मिळाले! चांदोबा आपला नाराज झाला. मनातल्या मनात साऱ्यावर रागावला. तेव्हापासून चांदोबा नीट काम करीत नाही. वेळेवर कामाला कधीच येत नाही. चौदा दिवस छोटा होतो, चौदा दिवस मोठा. त्यामुळे कामाचा फार होतो तोटा. सूर्यावर मात्र तो खूप खूप रागावला. “तोंडसुद्धा बघणार नाही” असं तो म्हणाला. सूर्य येताच आकाशात, तो जातो निघून. कुठे तरी भटकत बसतो, काळे कपडे घालून! अमावास्येच्या रात्री हमखास जातो पळून, एकच दिवस पौर्णिमेचा काम करतो हसून!