नांदगाव-मुरुड (वार्ताहर) : पावसाळ्यानंतर रायगड अलिबागमधील अनेक समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजलेले असतात. यंदा मात्र मुरुड, काशिदसह जंजिरा जलदुर्ग, पदमदुर्ग आदी ठिकाणी पर्यटक नसल्याने शूकशूकाट दिसत आहे. त्यामुळे येथील पर्यटक स्थळांवर अभूतपूर्व मंदी अनुभवायला मिळत आहे.
मुंबई-ठाणे, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांनी पाठ फिरवल्याने मुरूड तालुक्यातील समुद्रकिनारे ओस पडले आहे. मुरूड, नांदगाव, काशीद, बारशिव, आगरदांडा, खोरा जेट्टी, राजपूरी जेट्टी वर पर्यटक नसल्याने व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. केवळ मुरूड तालुकाच नाही तर रायगडमधील समुद्रकिनाऱ्यावर देखील अशीच परिस्थिती असल्याने येथील पर्यटन क्षेत्रात नवरात्रौत्सवात अभूतपूर्व अशी मंदीची स्थिती इतक्या वर्षांत प्रथमच दिसून येत आहे.
काही व्यावसायिकांनी सांगितले की, नवरात्रोत्सव असला तरी एरव्ही पर्यटकांची वर्दळ सुरू असते. असा २०१७ पर्यंतचा (कोरोना काळ वगळता) अनुभव आहे. या वेळी एकदम वेगळी परिस्थिती आहे. गजबजलेल्या समुद्रकिनारी मोजकीच वाहने आणि पर्यटक दिसून येत आहे. निव्वळ पर्यटन व्यावसायावर अवलंबून असलेले व्यावसायिक हवालदिल झाले आहे.
बहुतांश पर्यटक देवीच्या दर्शनाला
सध्या एकविरा, महालक्ष्मी, भवानी देवी अशा विविध देवस्थानामध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. कोरोना काळात भक्तांना देव- देवतांचे दर्शन दुर्लभ झाले होते. त्यामुळे यंदा सर्व देवस्थाने पूर्णपणे खुली झाल्याने बहुतांश पर्यटकांचे पाय देवींच्या मंदिराकडे वळल्याचे चित्र आहे. त्यातच सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत पावसाचा काळ वाढल्याने पर्यटकांनी पाठ फिरवली असल्याचे बोलले जात आहे.