Thursday, March 20, 2025
Homeताज्या घडामोडीठाकरेंचे सरकार ‘ना हलले ना फुलले’ : नारायण राणे

ठाकरेंचे सरकार ‘ना हलले ना फुलले’ : नारायण राणे

मुंबई (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त साजऱ्या होत असलेल्या ‘सेवा पंधरवड्या’निमित्त ‘नमो युवा रोजगार निर्मिती अभियान’अंतर्गत मुंबई भाजपातर्फे आयोजित भव्य स्वयंरोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना नारायण राणे यांनी मागील ‘मविआ’वर सडकून टीका केली. ठाकरे सरकारने अडीच वर्षांत स्वतः काहीही केले नाही आणि आता शिंदे-फडणवीस सरकार करू पाहत असलेल्या चांगल्या कामांवर टीका केली जात आहे, असा घणाघात राणे यांनी केला.

भाजपचे उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड यांच्या संकल्पनेतून आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्त्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याचे उद्घाटन शनिवारी योगी सभागृह, स्वामी नारायण मंदिर, दादर पूर्व येथे सकाळी झाले. यावेळी आशिष शेलार, राज्याचे महिला बालविकास मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर हे भाजप नेते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

उद्घाटनानंतर बोलताना राणे पुढे म्हणाले, ‘मराठीतील ‘चाफा बोलेना, चाफा चालेना’ या गाण्याचा उल्लेख इथे झाला. पण मातोश्रीच्या अंगणात असलेला चाफा उगवत नाही, फुलत नाही की बोलत नाही. अडीच वर्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या काळात ठाकरे सरकारने स्वतः काही केले नाही आणि आता नवीन सरकार जे चांगले आणि विधायक उपक्रम राबवीत आहेत, त्यात खोडा घालण्याचे काम ठाकरे करत आहेत. बाळासाहेब ठाकरेची सर सध्याच्या शिवसेना नेतृत्त्वाला नाही. भाजप ही लोकांसाठी काम करणारी आणि इतरांना काही मिळावे यासाठी झटणारी पार्टी आहे.’ राणे पुढे म्हणाले की, ‘मुंबई भाजपने जो उपक्रम राबविला आहे तो स्तुत्य आहे, पण तो केवळ उपक्रम न राहता त्याची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे. आज नवरात्रीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर इथे महिला जमा झाल्या आहेत आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी हा उपक्रम राबविला जात आहे, हे स्तुत्य आहे. महिला सक्षम झाल्या तर मुंबई सक्षम होईल, मुंबई सक्षम झाली तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्र सक्षम झाला तर भारत सक्षम होईल. या आणि अशा उपक्रमांतूनच माननीय मोदिजींच्या स्वप्नातील ‘आत्मनिर्भर भारत’ घडणार आहे.”

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आपल्या भाषणात म्हणाले, ‘आजचा स्वयंरोजगार मेळावा हा अभूतपूर्व असा उपक्रम आहे. नवरात्रीच्या काळातच महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा उपक्रम राबविला जातो आहे, हे विशेष. गेल्या अडीच वर्षांत मागील सरकारने लोकोपयोगी असे एकही काम केले असेल तर दाखवा. एक रुपयाचा निधी लोकांसाठी खर्च झाला नाही. तिकडे कॉंग्रेसचे नेते भारत जोडो यात्रेवर निघाले आहेत, पण ही भारत जोडो नाही तर भारत तोडो यात्रा आहे. या यात्रेतून ते काय साध्य करू पाहत आहेत? त्यातून रोजगार मिळणार आहे की प्रगती होणार आहे? केवळ इकडे तिकडे फिरत राहण्याने काय साध्य होणार आहे?’

महाराष्ट्र भाजप उपाध्यक्ष आणि या उपक्रमाचे संयोजक आमदार प्रसाद लाड यांनी असे मेळावे केवळ मुंबईपुरते मर्यादित न राहता ते संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित करण्यात येतील, असे जाहीर केले. या आयोजनाबाबत बोलताना ते म्हणाले, “राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून लाभार्थी म्हणून सर्वसामान्य जनतेला मग त्यांत महिला, युवक या घटकांना रोजगार नाही तर व्यवसायनिर्मिती कशी करावी यासाठी मदत केली जाणार आहे. मला वाटते की, या योजनेपासून महाराष्ट्रामध्ये मागच्या अडीच वर्षात जनता ही वंचित राहिली होती. त्या जनतेला न्याय देण्याचे काम माननीय देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वात मुंबई आणि महाराष्ट्रात करायचा प्रयत्न आम्ही करत आहोत. या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये रोजगार निर्मिती होईलच पण व्यवसाय निर्मितीदेखील अत्यंत प्रभावीपणे होईल. त्यातून हजारो-लाखों हातांना काम मिळणार आहे.”

महिला व युवकांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा भव्य स्वयंरोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ‘सक्षम युवा, सशक्त भारत’ संकल्पनेनुसार राज्य आणि केंद्र शासनाच्या रोजगार निर्मिती योजना या मेळाव्याच्या माध्यमातून युवक व महिलांना उपलब्ध करून देत त्यांना व्यवसायनिर्मिती करण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. कोणतीही आर्थिक गुंतवणूक न करता महिलांना व्यवसाय करता येणार असून यावेळी निवडलेल्या व्यवसायांसाठी मोफत प्रशिक्षण देण्याची सोय करण्यात येणार असल्याचे प्रसाद लाड यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -