कणकवली : जिल्ह्याच्या विविध भागात शुक्रवार सायंकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली होती. रात्रभर पावसाची रिपरिप सुरूच होती. आज, शनिवारी सकाळी कणकवली तालुक्यासह जिल्ह्यात जोरदार पावसाने सुरुवात केली आहे.
शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाल्याने काही भागातील विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता. मागील काही दिवसापासून उघडीप घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. भात पीक कापणीला आले आहे. कापणीच्या वेळी जर शेतामध्ये पाणी साचले तर हाता तोंडाशी आलेले भात पिकाचे मोठे नुकसान होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
हवामान खात्याने १ ते ५ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याप्रमाणे पावसाने बरसायला सुरूवात केली आहे. नवरात्रोत्सव सुरु असल्याने विविध कार्यक्रम सुरू आहेत. या कार्यक्रमांमध्ये व्यत्यय आल्याने नागरिकांचा हिरमोड झाला.