नामपूर (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील नामपूर येथील सुमारे पाचशे एकर क्षेत्रातील मक्याचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिपावसामुळे मक्याची मुळे सडून वाढ खुंटल्याने उत्पादकतेवर विपरीत परिणाम झाला आहे. परिणामी, उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
हरणबारी धरणाच्या आवर्तनाद्वारे रब्बी हंगामासाठी नामपूरमधील शेतीला कालव्यांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मोसम नदीच्या परिसरातील सुमारे पाचशे एकर क्षेत्र ओलीताखाली येते. मका पिकाला चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी जून महिन्यात मक्याचा पेरा घेतला. परंतु, यंदा सुरवातीपासूनच पावसाचा कहर असल्याने मक्याच्या पिकाची अक्षरशः माती झाली आहे.
शेतकऱ्यांना यंदा पहिल्यांदा ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. यंदा मार्च महिन्यापासून साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याला भाव नाही, तेल्या रोगाने डाळिंबबागा संकटात आहेत, खरिपाच्या हंगामात मजुरीचा खर्चही निघणार नाही, अशी वस्तुस्थिती असल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशा प्रतिकूल परिस्थितीचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे महसूल आणि कृषी विभागाने याबाबत गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.