मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चंपासिंह थापा आमच्यासोबत आले. आता उद्धव ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकर शिंदे गटात सहभागी होतील, असा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
गुलाबराव पाटील यांनी खोके घेतले म्हणता, पण आयुष्यभर बाळासाहेबांची सेवा करणारा चंपासिंह थापाने काय केले? त्यांनी बाळासाहेबांच्या चरणी संपूर्ण आयुष्य घालवले, ते देखील उद्धव ठाकरेंना सोडून आमच्यासोबत आले आहेत. थापा आला, आता मिलिंद नार्वेकर येत आहेत असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. थापा हे मातोश्रीवरील विश्वासू म्हणून ओळखले जायचे, बाळासाहेबांच्या प्रत्येक सभेला ते त्यांच्या सोबत असायचे त्यांनी ठाकरेंची साथ सोडल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गणेशोत्सवाच्या काळात मिलिंद नार्वेकरांच्या घरी जात त्यांची भेट घेतली होती. शिवसेनेतून बाहेर पडले असले, तरी शिंदेंनी नार्वेकरांसोबत संवाद कायम राखला आहे. तर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे सूरतमध्ये असताना आमदार रवींद्र फाटक आणि मिलिंद नार्वेकर यांना चर्चेसाठी सूरतला पाठविले होते. यात विधान परिषदेचे आमदार रविंद्र फाटक हे शिंदेंच्या सोबत गेले आहेत. त्यानंतर आता मिलिंद नार्वेकर सहभागी होणार या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
गेली ३ महिने शिवसेनेतील रोज एक नेता शिंदे गटामध्ये जाताना दिसून येत आहे. कधी काळी उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय समजली जाणारी माणसे शिंदेंच्या गटात सहभागी होत असल्याने शिवसेनेसमोरील अडचणी वाढत आहेत.