दीपक परब
दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (मोठी) यांच्यासाठी एक स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सोनाली यांना ‘स्मिता पाटील’ यांची उपमा दिली आहे. प्रचलित वाटेपेक्षा वेगळ्या वाटेने जाणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये सचिन कुंडलकर याचे नाव आवर्जून घेतले जाते. सचिन कुंडलकर यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमांमधून अनेक वेगळे विषय हाताळले आहेत. ‘रेस्टॉरंट’, ‘राजवाडे अॅण्ड सन्स’, ‘गंध’, ‘गुलाबजाम’, या सिनेमांतून सचिन यांचे वेगळेपण जाणवते. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘पाँडिचेरी’ हा सिनेमा देखील अशा वेगळ्या धाटणीचा होता. या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण सिनेमा स्मार्टफोनवर चित्रित करण्यात आला होता. तरीदेखील त्याच्या दर्जामध्ये कुठेही तडजोड केलेली नव्हती. मनोरंजन विश्वाबरोबरच सचिन सोशल मीडियावरही सक्रिय असतात. नुकतीच सचिन यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, प्रत्येक पिढीत एक स्मिता जन्माला येते. अपरिमित कष्ट आणि कॅमेऱ्याला समजणारा, उमजणारा कमालीचा बोलका असा त्यांचा चेहरा होता. सचिन कुंडलकर आणि सोनाली कुलकर्णी यांनी ‘गंध’, ‘गुलाबजाम’ या सिनेमांत एकत्र काम केले आहे. सोनाली ही गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
आलिया हॉलिवूडमध्ये गेलीया…
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आता लवकरच हॉलिवूडमध्ये झळकणार आहे. नेटफ्लिक्सच्या ‘हार्ट ऑफ स्टोन’ या वेबसीरिजमधून आलिया प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केलेच आहे. नुकताच प्रदर्शित झालेला तिचा चित्रपट ‘ब्रम्हास्त्र’ने देखील बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. पण आता आलियाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बॉलिवूड सिनेसृष्टीवर आपले स्थान निर्माण केल्यानंतर आता आलिया हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. म्हणजेच ‘आपली आलिया आता हॉलिवूडमध्ये गेलीया…’ असेच म्हणायला हवे. नेटफ्लिक्सच्या ‘हार्ट ऑफ स्टोन’ या वेबसीरिजच्या माध्यमातून आलिया हॉलिवूडमध्ये दिसणार आहे. या सीरिजचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला आहे.
आलिया भट्टने स्वत: तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या सीरिजचा ट्रेलर शेअर केला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हार्ट ऑफ स्टोन’च्या ट्रेलरमधून आलियाची पहिली झलक समोर आली आहे. यामध्ये आलिया जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. या सीरिजमध्ये आलियाच्या पात्राचे नाव ‘किया’ आहे. ‘नेटफ्लिक्स’ने रिलीज केलेल्या ‘हार्ट ऑफ स्टोन’ सीरिजचा ट्रेलर तर दमदार आहे. यामध्ये अनेक महिला व्यक्तिरेखा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यात आलिया व्यतिरिक्त वंडर वुमन म्हणजेच गॅल गॅडोट, सोफी ओकेनाडो आणि पॉल रेडी या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘हार्ट ऑफ स्टोन’ नोव्हेंबर २०२३ मध्ये ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित होईल. मात्र ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. आलियाच्या या पोस्टवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी तसेच चाहत्यांनी सोशल मीडियावर आलियावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आलियाच्या आधीही अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी हॉलिवूड सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. त्यामध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, तब्बू या अभिनेत्रींचा समावेश आहे.
‘मी पुन्हा येईन…’ उलगडेल रहस्य
‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात विविध माध्यमांतून गाजते आहे. आता या नावाची वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सीरिजचा भन्नाट ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला. ‘मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन…’ असे म्हणत राज्यात सुरू झालेले सत्तानाट्य कुठल्या दिशेला गेले व जाईल, याचा काही नेम नाही. राजकारणातले हेच धक्कातंत्र आणि सत्तानाट्य आता वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मी पुन्हा येईन…’ नावाची वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजचा ट्रेलर नुकताच शेअर करण्यात आला. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली. आता हेच सगळे वेबसीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. राजकारणातील सत्तानाट्यावर आधारित ‘मी पुन्हा येईन’ नावाची वेबसीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे याचे लेखन आणि दिग्दर्शन अरविंद जगताप यांनी केले आहे. या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव, प्रभाकर मोरे, अमित तडवळकर, रमेश वाणी, संजय कुलकर्णी, राजेश दुर्गे, राजेंद्र गुप्ता, रुचिता जाधव, सीमा कुलकर्णी आणि दीप्ती क्षीरसागर अशी दमदार कलाकारांची फळी आहे.
या वेबसीरिजविषयी माहिती देताना अरविंद जगताप म्हणाले, ‘बहुमतासाठी पक्षांची चाललेली केविलवाणी धडपड, आमदारांची पळवापळवी, नेत्यांची कारस्थाने कुठल्या थराला जातात याचे गमतीशीर चित्रण ‘मी पुन्हा येईन’ या कलाकृतीत केले आहे. याचा वास्तवाशी संबंध नाही. कारण वास्तवातल्या राजकारणाच्या पातळीपर्यंत पोहोचणे अशक्य आहे.
‘३६ गुण’ जुळतात का बघा…
अभिनेता संतोष जुवेकरचा आगामी ‘३६ गुण’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलीकडेच या सिनेमाचे पोस्टर आऊट झाले आहे. ‘३६ गुण’च्या रोमँटिक पोस्टरने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘३६ गुण’ म्हटले की, डोळ्यांसमोर येते ते म्हणजे लग्न. लग्न जुळवताना ‘३६ गुण’ पाहिले जातात. अनेक जणांमध्ये वाद किंवा भांडण असेल तेव्हा दोघांमध्ये ‘३६ गुण’चा आकडा आहे, असे म्हटले जाते. असाच ‘३६ गुणां’वर भाष्य करणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमात संतोष जुवेकर आणि अभिनेत्री पूर्वा पवार मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा समित कक्कडने सांभाळली आहे. तरुण पिढीच्या दृष्टिकोनातून भारतीय लग्नसंस्थेवर भाष्य करणारा हा मनोरंजक सिनेमा आहे. या सिनेमाचे शूटिंग मुंबई आणि लंडनमध्ये पार पडले आहे. आतापर्यंत न पाहिलेले लंडन आणि वेगळा विषय ‘३६ गुण’ या सिनेमात मांडण्यात आला आहे. घरदार बघून चहा – पोह्यांचा रितसर कार्यक्रम करून, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आणि थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने विवाह झालेले, सुधीर आणि क्रिया हे त्यांचा मधुचंद्र लंडनला करायचा ठरवतात आणि तिथे पोहोचल्यावर मात्र त्यांना एकमेकांमध्ये दिसणाऱ्या गुण-अवगुणांची, आपापसातील वेगळेपणाची जाणीव होते आणि पुढे काय गंमत घडते यावर ‘३६ गुण’ भाष्य करतो. संतोष आणि पूर्वासह ‘३६ गुण’ या सिनेमात पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर, वैभव राज गुप्ता, स्वाती बोवलेकर हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘३६ गुण’ येत्या ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.