वाडा : शहरातील मुख्यबाजार पेठेत चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून एकाच रात्रीत सहा दुकाने फोडली तर चोरी करतानाच चोर सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. ही घटना शुक्रवार रात्रीच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अशोक टी अँड स्वीट मार्ट, मधुकर सखाराम पातकर किराणा स्टोअर्स, श्री साईदत्त जनरल अँड कॉस्मेटिक स्टोअर्स, मधु किराणा स्टोअर्स, श्रीसमर्थ कृपा मोबाईल, श्री समर्थ फूट वेअर या सहा दुकानाची कुलपे तोडून चोराने प्रत्येक दुकानात असलेली चिल्लर व काही रोख रक्कम चोरून पसार झाला आहे.
दोन दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरेत चोरी करताना त्याची क्षणचित्रे दिसून आली आहेत वाडा पोलीस ठाण्यात दुकान मालक यांनी तक्रार दाखल केली आहे. सहा दुकानातून किती रक्कम चोरीला गेली आहे याची माहिती अजून निश्चित झालेली नाही मात्र दुकानदार यांच्या माहिती नुसार प्रत्येक दुकानातून पाच ते सात हजार रुपयांपर्यंत रक्कम चोरीला गेली आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर लोंढे करीत आहेत.