नवी दिल्ली : ‘इंडिया मोबाइल काँग्रेस’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ५जी दूरसंचार सेवेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. ही सेवा ४जी तुलनेत १० पट वेगवान असणार आहे.
दिल्लीतील प्रगती मैदानावर १ ते ४ ऑक्टोबर या काळात इंडिया मोबाइल काँग्रेस’चे आयोजन केले आहे. ‘इंडिया मोबाइल कॉंग्रेस हा दूरसंचार क्षेत्रातील सरकार समर्थित कार्यक्रम आहे. सेवा तूर्तास काही निवडक शहरांतच उपलब्ध असेल. काही वर्षांत तिचा विस्तार देशभर विस्तार केला जाणार आहे. आज झालेल्या उद्घाटनाला केंद्रीय दूरसंपर्कमंत्री अश्विनी वैष्णव, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हेही उपस्थित होते.
रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या कंपन्या स्पर्धेत आहेत. १ ऑक्टोबरपासून वाराणसी (उत्तर प्रदेश) आणि अहमदाबाद (गुजरात) येथे जिओच्या ५ जी सेवेस सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात दिवाळीपर्यंत ५जी सेवा सुरु केली जाईल. यासोबत दिल्ली, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, बंगळुरु, चंदीगड, गांधीनगर, हैदराबाद, जामनगर, लखनौ या शहरांमध्येही ५जी सेवा सुरु केली जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातील १३ शहरांमध्ये ५जी सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारने अलीकडेच ५१,२३६ मेगा हर्टड ५ जी स्पेक्ट्रमचे वितरण दूरसंचार कंपन्यांना केले आहे. जिओने ८८,०७८ कोटी रुपयांचे, तर एअरटेलने ४३,०८४ कोटी रुपयांचे ५ जी स्पेक्ट्रम खरेदी केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, जिओ येत्या दिवाळीपर्यंत दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता यांसह सर्व प्रमुख शहरांत ५ जी सेवा सुरु करणार आहे.
डिसेंबर २०२३ पर्यंत संपूर्ण भारतात कंपनीचे ५ जी कव्हरेज असेल. एअरटेलही ऑक्टोबरमध्ये ५ जी सेवा सुरु करीत आहे.
दूरसंपर्कमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ जीच्या तुलनेत ५ जी सेवेची गती १० पट अधिक असणार आहे. तसेच किंमत १० ते १५ टक्के अधिक असणार आहे.