Wednesday, July 17, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणनव्या वर्षात कोकणात धावणार एसटीच्या ५० शयनयान बस

नव्या वर्षात कोकणात धावणार एसटीच्या ५० शयनयान बस

मुंबई (प्रतिनिधी) : खासगी बस कंपन्यांची वाढती स्पर्धा लक्षात घेऊन एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या मार्गावरील अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विनावातानुकूलित शयनयान आणि आसन व्यवस्था असलेल्या स्वमालकीच्या बस ताफ्यात दाखल केल्या आहेत. आता एसटी महामंडळाने फक्त शयनयान प्रकारातील विनावातानुकूलित ५० नवीन बस ताफ्यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. या बस केवळ कोकणात ‘रातराणी’ म्हणून प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

खासगी प्रवासी वाहतूक कंपन्यांची वाढती स्पर्धा लक्षात घेऊन एसटी महामंडळाने काही वर्षांपूर्वी शिवशाही वातानुकूलित शयनयान बसगाड्या घेतल्या. या बस सेवेत आल्यानंतर जादा भाडेदरामुळे प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरवली होती. महामंडळाने त्यांच्या भाडेदरात कपात केली. मात्र त्यालाही प्रतिसाद मिळत नसल्याने ही सेवा बंदच करण्यात आली. त्यामुळे एसटी महामंडळाचा वातानुकूलित शयनयान प्रयोग पूर्णपणे फसला. वातानुकूलित बसगाड्यापाठोपाठ नोव्हेंबर २०१९ मध्ये एकाच बसमध्ये शयनयान आणि आसन व्यवस्था असलेली विनावातानुकूलित बस महामंडळाने घेतली. या स्वमालकीच्या बस सेवेला काही प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

लांब पल्ल्याच्या मार्गावर या बस ‘रातराणी’ म्हणून चालवण्यात येणार असून त्यासाठी कोकणातील मार्गांचाही विचार करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सध्या राज्यात एसटीच्या २५६ मार्गांवर ५०० हून अधिक बसगाड्या ‘रातराणी’ म्हणून धावत असून यात साध्या, निमआराम, तसेच शयन आणि आसन व्यवस्था असलेल्या बसचा समावेश आहे. शयन आणि आसन व्यवस्था असलेल्या बसमध्ये ३० पुश बॅक आसन व १५ शयनयान अशी प्रवासी क्षमता आहे.

सध्या अशा २१८ बस ताफ्यात आहे. आता महामंडळाने केवळ शयनयान प्रकारातील ५० बस ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियाही राबवण्यात आली असून बससाठी लागणारा सांगाडा टाटा कंपनीकडून घेण्यात येईल आणि त्यानंतर एसटी महामंडळ त्याची बांधणी करणार आहे. मार्च २०२३ पर्यंत या बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल करण्याचा प्रयत्न असेल. त्यानंतरच या बस प्रवाशांच्या सेवेत येतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -