नाशिक : कुष्ठ व क्षयरोग विशेष वैद्यकीय तपासणी अभियानात निफाड तालुक्यात एकूण ४१ जण बाधित असल्याचे सर्व्हेक्षणात आढळून आले आहे. मागील १५ दिवसांपासून प्रशिक्षित वैद्यकीय पथकामार्फत नागरिकांची तपासणी सुरू होती. एकूण चार हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ पथकाने बाधित व विनाबाधित रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी घोषित केली आहे. त्यात २१ कुष्ठ, तर २० क्षयरुग्ण आढळून आले आहेत.
दरवर्षी आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय तपासणीसह विशेष अभियानात १३ ते ३० सप्टेंबरपर्यंत कुष्ठ व क्षय रग्ण शोधमोहीम अभियान राबविण्यात आले. आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ते या प्रशिक्षित पथकाने घरोघरी जाऊन वैद्यकीय तपासणी केली. १० हजार घरांना भेटी देऊन ३७२ प्रशिक्षित पथकाने तपासणी केली.
तपासणीत क्षयरोगाची लक्षणे असलेल्या रुग्णांचा मोफत एक्स-रे, थुंकी नमुना तपासण्यात आला, तर कुष्ठरुग्णाचा चट्टे तपासण्यात आले. एक हजार ४४१ संशयित कुष्ठ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात २१ जणांचे कुष्ठरोगांचे निदान झाले, तर क्षय रुग्णांसाठी दोन हजार ४७३ नागरिकांची थुंकी नुमने तपासले गेले.
त्यात २० जण बाधित आढळले आहेत. कुष्ठरोगांचे ओझर प्राथमिक आरोग्य केद्रांतंर्गत सर्वाधिक कुष्ठरोगांचे चार, तर क्षय रोगांचे दोन नागरिक बाधित आढळले आहेत. यापूर्वीच्या बाधित रुग्णांच्या घरातील व्यक्तींची तपासणी अधिक प्रमाणात करण्यात आली. निफाड तालुक्यात कुष्ठ व क्षयरोगांच्या नियंत्रणांसाठी आरोग्य विभाग व्यापक तयारी करीत आहे. काही गावांत अधिकाधिक चाचण्या आणि जागृती कार्यक्रम घेत असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.