Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीआरबीआयकडून रेपो दरात ५० बेसिस पॉईंट्सची वाढ

आरबीआयकडून रेपो दरात ५० बेसिस पॉईंट्सची वाढ

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) चलनविषयक धोरण समितीचे निर्णय जाहीर केले. यामध्ये रेपो दरात ०.५० टक्के बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली. यामुळे ग्राहकांच्या ईएमआयमध्ये वाढ होणार असून, सामान्यांचे आर्थिक गणित बिघणार आहे.

आजच्या वाढीसह, रिझर्व्ह बँकेने मे महिन्यापासून रेपो दरात चार वेळा वाढ केली आहे. आजच्या रेपो दरात वाढीच्या निर्णयानंतर रेपो दर आता ५.९० टक्क्यांवर आला आहे. जो पूर्वी ५.४० टक्क्यांवर होता. रेपो दरातील वाढ तत्काळ प्रभावाने लागू करण्यात येणार असल्याचेही दास यांनी म्हटले आहे. याआधी ऑगस्टमध्ये आरबीआयने रेपो दरात ५० बेसिस पॉईंटची वाढ केली होती.

दास म्हणाले की, महागाई वाढण्याचा धोका अजूनही कायम असून आव्हानात्मक काळात देशाची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचे ते म्हणाले. सणासुदीच्या काळात मागणी वाढल्याने महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.

रेपो दरात वाढ केल्याने सर्व प्रकारची कर्जे महाग होणार आहेत. वास्तविक रेपो दराच्या माध्यमातून आरबीआय बँकांना कर्ज देते. तर, याउलट रिव्हर्स रेपो रेट हा व्याज दर आहे जो मध्यवर्ती बँक आरबीआयकडे पैसे ठेवण्यासाठी बँकांना देते. त्यामुळे सामान्यतः असे मानले जाते की, जर आरबीआयने रेपो दर कमी केला तर बँका व्याजदर कमी करतात. तर, आरबीआयने जर रेपो दर वाढवला तर, बँका व्याजदर वाढवू शकतात. त्यामुळे सर्वसामान्यांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते महाग होऊ शकतात.

रिझर्व्ह बँक देशातील बँकांना कर्ज उपलब्ध करून देत असते. या कर्जावरील व्याजदराला रेपो दर म्हणतात. दररोजच्या व्यवहारांसाठी बँकांना मोठ्या रकमेची गरज असते. या अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो तो रेपो रेट असतो. बँकांना रिझर्व्ह बँकेला ही कर्जाची रक्कम या रेपो दराने व्याजासह परत द्यावी लागते. रिव्हर्स रेपो दर म्हणजे बँकांना त्यांनी रिझर्व्ह बँकेकडे ठेव स्वरुपात ठेवलेल्या रकमेवर व्याज मिळते. त्या व्याजदराला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.

जगभरातील अनेक केंद्रीय बँका महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्याने व्याजदरात वाढ करत आहेत. अमेरिकन फेड रिझर्व्हने व्याज दरात सलग ७५ बेसिस पॉईंट्सची वाढ केली होती. त्यानंतर रुपयाच्या मूल्यावरही दबाव वाढला होता.

या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वास्तविक जीडीपी वाढ अपेक्षेपेक्षा कमी होती, तरीही १३.५ टक्के आहे आणि कदाचित प्रमुख जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक आहे, असे दास यावेळी म्हणाले.

रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी आपला जीडीपी वाढीचा अंदाज ७.२ टक्क्यांवरून ७ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. “आज महागाई ७ टक्क्यांच्या आसपास आहे. वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत ती ६ टक्क्यांवर राहील अशी आमची अपेक्षा आहे,” असे दास म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -