कर्जत (वार्ताहर) : मागील वर्षभरात कर्जत -मुंबई मध्य रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात झाले असून यामध्ये अनेक तरुणांनी आपला जीव गमवला आहे. यामध्ये विशेषकरून रेल्वे रूळ ओलांडताना तसेच लोकलच्या दरवाजाला लोंबकळून प्रवास करणाऱ्या तरुणांचा जीव गेला आहे. त्यामुळे अशा दुर्दैवी घटना रोखण्याचे आव्हान रेल्वे प्रशासनापुढे आहे.
कर्जत भिवपुरी रेल्वे मार्गावर ३ सप्टेंबर ला एका अनोळखी तरुणाला रेल्वेची धडक बसून तो गंभीर जखमी झाला. त्याचे अंदाजे वय ३५ असून त्याला नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या संदर्भात कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे कर्जत पोलिसांनी केले आहे. कर्जत वांगणी रेल्वे मार्गादरम्यान ११ सप्टेंबर रोजी नेरळ स्थानकापासून काही अंतरावर उद्यान एक्स्प्रेसची धडक लागून एका २८ वर्षाचा अनोळखी तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला ठाणे येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर कर्जत-वांगणी- बदलापूर रेल्वे दरम्यान २२ सप्टेंबर रोजी लोकलची धडक लागून ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
गेल्या काही दिवसापासून या मार्गावर अनेक जणांना अपघातामध्ये मृत्यू होत आहे. मात्र रेल्वे आणि पोलीस प्रशासनाला याचे कोणतेच गांर्भीय नसल्याचे समोर येत आहे. या मागार्वर अनेक ठिकाणी सिंग्नल असून अनेक जण बिनदिक्कत रुळ ओलंडताना दिसतात. मात्र याकडे रेल्वे तसेच पोलीस प्रशासन कानाडोळा करते. तसेच सकाळी आणि संध्याकाळच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर चाकरमानी स्थानकामध्येच रुळ ओलांडत असतात. याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.