नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियामध्ये १६ ऑक्टोबरपासून पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम आयसीसीने जाहीर केली आहे. अंतिम विजेत्या संघाला १३ कोटी ५ लाख ३५ हजार रुपयांचे बक्षिस मिळणार आहे. उपविजेत्या संघाला ६ कोटी ५२ लाख ६४ हजार रुपयांचे बक्षिस देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेत एकूण ४५.६८ कोटी रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
आयसीसीने विश्वचषक स्पर्धेच्या बक्षीस रकमेत कोणताही बदल केलेला नाही. यूएईमध्ये झालेल्या गेल्या विश्वचषक स्पर्धेत विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाला एवढीच रक्कम दिली होती. उपविजेत्या न्यूझीलंडला ६.५ कोटी रुपये दिले होते. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे या वेळी रुपयाच्या तुलनेत अधिक पैसे उपलब्ध होतील. गेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले होते.
उपांत्य फेरीतील पराभूत संघांना ३ कोटी २६ लाख २० हजार २२० रुपये देऊन सन्मानित केले जाईल. सुपर १२मधील प्रत्येक विजयासाठी ३२ लाख ६२ हजार २२ रुपये, सुपर १२ मधून बाहेर पडल्यावर ५७ लाख ०८ हजार १३ रु., पहिली फेरी जिंकल्यावर ३२ लाख ६२ हजार २२ रुपये दिले जातील. पहिल्या फेरीतून बाहेर पडल्यावर ३२ लाख ६२ हजार २२ रुपये दिले जाणार आहेत.