शरद पोंक्षे
१५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला. मात्र संपूर्ण भारत खंड स्वतंत्र होऊ शकला नाही. या देशाला स्वातंत्र्य मिळाले, मात्र काँग्रेसच्या मुस्लीम लांगुलचालनाच्या धोरणामुळे त्याआधी २४ तास आधी म्हणजे १४ ऑगस्ट १९४७ रोजी देशाचे धर्माच्या नावावर दोन तुकडे झाले आणि एका मुस्लीम राष्ट्राची पाकिस्तानरूपी निर्मिती झाली. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून सावरकरांपर्यंत सगळे जण कंठशोष करत सांगत होते की, इथला शेवटचा मुस्लीम तिकडे पाठवा आणि तिथला शेवटचा हिंदू इकडे येऊ द्या, म्हणजे ती फाळणी योग्यरीत्या होईल. मात्र काँग्रेस, गांधीवाद्यांनी या भूमिकेस विरोध केला. फाळणीनंतर भारतात ८ टक्के मुस्लीम राहिले होते, त्या ८ टक्क्यांचे प्रमाण गेल्या ७५ वर्षांत २२ टक्के इतके वाढले.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसच्या सत्ताकाळात मुस्लीम लांगुलचालनाची नीती गल्ली ते दिल्ली राबवली गेली. हिंदुत्ववाद म्हणजे पाप, हिंदुत्ववाद म्हणजे जातीयवाद, हिंदुत्व म्हणजे गैरहिंदूंना संपवून टाकणे असे वातावरण काँग्रेस, डाव्यांनी, उदारमतवाद्यांनी मागच्या ६०-७० वर्षांमध्ये जाणूनबुजून तयार केले. हिंदुत्ववादाच्या विरोधात वातावरण तयार केल्याने हिंदुस्तानात हिंदू असणे हा मोठा गुन्हा असल्यासारखी स्थिती निर्माण झाली. या खोट्या प्रचाराला चोख उत्तर देण्यासाठी एका प्रखर हिंदुत्ववादी नेत्याची गरज होती. ही गरज २०१४ साली झालेल्या “नरेंद्रोदया’’मुळे पूर्ण झाली. १९व्या शतकात एका ‘नरेंद्रा’ने संपूर्ण जगभर हिंदुत्ववादाचा प्रसार करण्याचे कार्य केले. हिंदुत्वाचा विचार, हिंदू संस्कृतीची खरी ओळख करून देण्यासाठी नरेंद्र ऊर्फ स्वामी विवेकानंद यांनी अथक परिश्रम घेतले. मात्र २० व्या शतकात काँग्रेसने याच हिंदुत्ववादाला पाप बनवले. आपण हिंदू आहोत, असे म्हणवून घेण्याची लाज हिंदूंना वाटावी, अशी मानसिकता काँग्रेसने पद्धतशीरपणे रुजवली. याचवेळी हिंदूंची संस्कृती, शौर्य, परंपरा यांचा इतिहास पुसून टाकण्याचे काम नेहरूवादाने केले. राम मंदिर, काश्मीरमधील ३७० कलम, ३५ अ कलम, तिहेरी तलाक, समान नागरी कायदा अशा अनेक विषयांवर ‘ब्र’ काढण्याची हिंमत कोणी दाखवली नव्हती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेला भारतीय जनता पक्षही स्पष्ट बहुमतावर सत्ता मिळेपर्यंत हे मुद्दे प्रखरपणे मांडू शकत नव्हता. अटलबिहारी वाजपेयी यांना पंतप्रधान झाल्यानंतर, संपूर्ण बहुमताअभावी हिंदुत्ववादाच्या मुद्द्यांना हात घालता आला नव्हता. अशा दबलेल्या, घाबरलेल्या स्थितीत समस्त हिंदूंना नवऊर्जा देणारे उमदे नेतृत्व हवे होते. ते नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला मिळाले. २००१ साली गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे त्यांच्याकडे सोपविली गेली. कोणत्याही संवैधानिक पदाचा अनुभव नसलेला, घरादारावर तुळशीपत्र ठेवून देव, देश आणि धर्माला वाहून घेणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा समर्थ कार्यकर्ता गुजरातचा मुख्यमंत्री बनला. मुख्यमंत्री झाल्या झाल्या त्यांच्यासमोर गोध्रा हत्याकांडाच्या रूपाने महाभयंकर संकट उभे ठाकले.
लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी कारसेवेचे काम सुरू झाले होते त्यात अनेक हिंदुत्ववादी संघटना सामील झाल्या होत्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शिवसेना यांचे कार्यकर्ते कारसेवेत उत्साहाने सहभागी झाले होते. त्याच दरम्यान कारसेवा करून परतत असलेल्या कारसेवकांच्या रेल्वेच्या डब्याला आग लावून त्या डब्यातील सर्व कारसेवकांची मुसलमानांनी निर्घृण हत्या केली. या हत्याकांडाची परिणती हिंदू मुस्लीम दंग्यामध्ये झाली. सत्तापदाचा पूर्वानुभव नसलेल्या मोदी यांनी दंगलीचे संकट समर्थपणे हाताळताना हिंदूंना मोठे बळ दिल्याने गुजरातमध्ये २००१ नंतर आजतागायत जातीय दंगे करण्याची हिंमत कुणी केली नाही. याचे श्रेय मोदीजींना कुणी दिले नाहीच, उलटपक्षी दंगलीचे सारे खापर मोदीजींच्या माथी फोडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध खटले दाखल झाले, त्यांना बदनाम करण्यात आले. मात्र याला पुरून उरत हा नेता धाडसाने निवडणुकीला सामोरा गेला.
२०१४ नंतर पंतप्रधानपद सांभाळताना मोदीजींची सत्त्वपरीक्षा होती. देशासमोर अगणित प्रश्न, समस्या सोडविताना मोदीजींनी दाखवलेले कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. त्यांचा राज्यकारभार पाहताना मला छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे यांची आठवण झाल्याखेरीज राहात नाही. समोरच्या शत्रूला जे काही डावपेच, युद्ध नीती अवलंबायची आहे ती अवलंबू देण्याची शिवाजी महाराजांची, बाजीराव पेशव्यांची रणनीती होती. अखेरपर्यंत शत्रूला चाली करायला मुभा द्यायची आणि मग अगदी शेवटच्या निर्णायक क्षणी जबरदस्त खेळी करत शत्रूला नामोहरम करण्याची शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशव्यांची नीती अवलंबत मोदीजी अत्यंत संयमाने वाटचाल करत आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही मोदीजी देशाच्या विकासाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी अहर्निश काम करत आहेत. अत्यंत टोकाची टीका करूनसुद्धा त्याचा काडीचाही परिणाम मोदीजींवर होत नाही. जनहित, देशसेवा या ध्येयाने प्रेरित होत ते आपल्या परिने पुढे जात आहेत. मोदीजींनी कधीही टीकाकारांना उत्तर दिलेले नाही. सत्तेचा गैरवापर करत कुणाचा आवाज दाबण्याचा प्रयत्नही केला नाही. देव, देश आणि धर्मासाठी काम करण्याचा वसा मोदीजींनी घेतला आहे.
लोकशाहीच्या चौकटीमध्ये राहून हिंदुत्ववाद कसा रुजवायचा याची उत्तम जाण जितकी मोदीजींना आहे तितकी कुणालाच नाही . मोदीजींनी गांधीवादाचे कौतुक करत मुळात सावरकरवादच अंमलात आणला.हे विशेष.२०१४ साली मोदीजींच्या प्रचारासाठी मी अनेक प्रचार सभा घेतल्या होत्या . ‘स्वतंत्रते भगवती’ सारखा कार्यक्रमही आयोजित केला होता. दीड दोन वर्षांनंतर काही निर्णयांमुळे मी मोदीजींवर टीकाही केली होती. मात्र ती टीका चुकीची होती हे मोदीजींनी पुढच्या दोन वर्षांत सिद्ध करून दाखवले. मोदीजींची रणनीती प्रचंड वेगळी आहे. मुळात नरेंद्र मोदी नावाचे रसायन काय आहे हे लक्षात येणे खूपच कठीण आहे. कलम ३७०, राम मंदिराची उभारणी हे प्रश्न कधीच सुटणार नाहीत असेच सर्वांना वाटत होते. मात्र ही किमया मोदीजींनी करून दाखवली. कुठे माघार घ्यायची, कुठे नेटाने योजना राबवायची ह्याची जाण मोदीजींना आहे. शेतक-यांच्या भल्यासाठी तयार केलेले कृषी कायदे, रणकंदन माजले तेव्हा मागे घेतले. पवारांनी कृषी मंत्री असताना हा कृषी कायदा यावा यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. मात्र त्यांनीच या कायद्यांना विरोधासाठी विरोध म्हणून टोकाची टीका केली. इतकेच नव्हे तर अपप्रचार करून लोकांची माथी भडकवली. इतके गलिच्छ राजकारण चहुबाजूंनी होत असताना मोदीजी मात्र सकारात्मक राजकारण करत देशाला विकासाच्या, आत्मनिर्भर भारताच्या दिशेने घेऊन जात आहेत.
विरोधकांना एकजुटीने मोदीजींना विरोध करायचा आहे. मात्र त्यांच्याकडे मोदीजींसारखे खणखणीत नाणे नाही. विरोधकांना मोदीजींना सपशेल हरवायचे आहे मात्र त्यांच्याकडे मोदीजींसारखा कर्तृत्ववान कर्णधार नाही. कमालीचा संयम, सखोल अभ्यास आणि कुशल रत्नपारख्यासारखी नजर या गुणांच्या बळावर मोदीजींनी अनेक कर्तृत्ववान नेत्यांची फळी निर्माण केली आहे. मोदीजींची राजकीय मुत्सद्देगिरी पाहिली की भगवान श्रीकृष्णच आठवतो. त्यांचा वाढदिवस साजरा करताना आनंद नक्कीच आहे. मात्र वयाच्या पंचाहत्तरीनंतर राजकारणातून निवृत्त व्हायला हवे, या त्यांनीच घालून दिलेल्या नियमानुसार मोदीजींना देखील काही वर्षांनी राजकारणातून निवृत्त व्हावे लागणार याचे कमालीचे दु:ख आहे. मात्र देशहितासाठी मोदीजींनी या नियमाला अपवाद करत राजकारणातून बाजूला होण्याचा निर्णय घेऊ नये. देशहितार्थ मोदीजींनी अधिकाधीक काळ कार्य करत रहावे अशीच माझ्यासारख्या अनेकांची मनापासूनची इच्छा आहे. मोदीजींना सुदृढ, निरामय आरोग्य लाभूदे हीच शुभेच्छा.