नंदुरबार : महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारा राज्य मार्ग क्रमांक ६ वर असलेला रंका नदीवरील धानोरा पूल आज सकाळी नऊच्या सुमारास कोसळल्याने महाराष्ट्र आणि गुजरातचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, यावेळी कोणतेही वाहन या पुलावर नसल्यामुळे यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
हा पूल ४५ वर्षे जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या पुलाला तडे गेले होते. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. गुरूवारी सकाळी अचानक मोठा आवाज करीत हा पूल कोसळला. एकुण सहा गाळ्यांपैकी तीन गाळे कोसळले. हा मार्ग नंदुरबार ते गुजरात मधील उच्छल व पुढे सुरत जाण्यासाठी सोयीचा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या मार्गावर वाहतूक असते. आता पूल कोसळल्याने गुजरात कडील वाहतूक ठप्प होणार आहे. या घटनेची चौकशी करण्याची मागणी होत आहे.