Friday, May 9, 2025

तात्पर्य

बॅ. नाथ पै विमानतळ...!

बॅ. नाथ पै विमानतळ...!

संतोष वायंगणकर


महाराष्ट्रात राजकारण ढवळून निघत आहे. रोज नवनवीन राजकीय घडामोडी घडत आहेत. अर्थात सध्याच्या राजकारणातील घडामोडी त्या काही नवीन नाहीत. त्या रोजच्याच आहेत. अशी जनतेलाही सवयच झालीय. या सर्व बदलत्या राजकारणातून थोडसं मागे वळून पाहिल्यावर कोकणातून लोकसभेत निवडून जाणारे बॅ. नाथ पै लोकसभा गाजवायचे. बॅ. नाथ पै आणि कोकण असं एक फार वेगळं जिव्हाळ्याचं नातं आहे. समाजवादी विचार कोकणच्या मातीत, माणसांच्या मनात ज्यांनी रुजवला, फुलवला ते बॅ. नाथ पै! नाथ पै... म्हणजे एक अतिशय बुद्धिमान, अमोघ वाणी, शब्दप्रभू, फर्डे इंग्रजी बोलणारे व्यक्तिमत्त्व. बॅ. नाथ पै यांना अख्ख कोकण ‘नाथ’ म्हणूनच ओळखत होते. पन्नास वर्षांपूर्वीचे कोकण कसे असेल याचा क्षणभर जरी विचार केला तरीही कोणत्याही सुविधा नसणारं हे कोकण बॅ. नाथ पै यांच्या विचाराने आणि तत्त्वज्ञानाने निश्चितच समृद्ध होते. बॅ. नाथ पै यांच्यावर कोकणच्या जनतेचं अलोट प्रेम होते. नाथांनी बोलावे आणि लोकांनी ऐकावे असा तो काळ होता. स्वत:च्या घरची चटणी-भाकरी खाऊन काम करणारा ‘कार्यकर्ता’ होता. नि:स्वार्थ भावनेने काम करत राहणारा कार्यकर्ता होता. नेता आणि कार्यकर्ता यांचे फार जीवाभावाचे नाते होते. बॅ. नाथ पै देखील कोकणातील अनेक घरांमध्ये मीठ-भाकरी खाऊन राहिले आहेत. बॅ. नाथ पै यांच्या भाषणांची मेजवाणी हेच त्यांच्यासाठी सर्व काही होते.


आजच्यासारखा कार्यकर्ता हा ‘ठेकेदार कम कार्यकर्ता’ या नव्या व्याख्येत बसणारा नव्हता. त्याच कार्यकर्त्यांचं जग हे सीमित होते. त्याला साधं राहाणे आवडायचं. बॅ. नाथ पै कोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करायचे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मिळून तो राजापूर मतदारसंघ होता. या राजापूर लोकसभा मतदारसंघाचे नाव देशाच्या सर्वोच्च सभागृहात बॅ. नाथ पै यांच्यामुळेच आदराने घेतले जायचे. भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू हे विशेषकरून बॅ. नाथ पै यांची भाषणं ऐकण्यासाठी उत्सुक असत. पं. जवाहरलाल नेहरू काँग्रेसच्या विचारधारेतील आणि बॅ. नाथ पै समाजवादी विचारांचे; परंतु बॅ. नाथ पै यांचे लोकसभेतील भाषण हे उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारे असे. ओघवत्या शैलीतील भाषणातून जे विचार व्यक्त व्हायचे त्यातून देशालाही एक वेगळा विचार दिला जात होता. म्हणूनच त्याकाळी बॅ. नाथ पै यांच्याशी वैचारिक स्वरूपाचे मतभेद असतानाही बॅ. नाथ पै यांच्याविषयी नितांत आदर करणारे असंख्य काँग्रेस नेते होते. लोकसभेतील कोणत्याही चर्चेत बॅ. नाथ पै यांनी बोलावे, भाष्य करावे असा दस्तुरखुद्द पं. जवाहरलाल नेहरूंचाच आग्रह होता. बॅ. नाथ पै यांना पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी काँग्रेस पक्षात या, बॅ. नाथ पै तुम्हाला मंत्रीपद देऊ, अशी ऑफर दिली होती; परंतु कोणत्याही गोष्टीपेक्षा तत्त्व आणि विचाराला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या बॅ. नाथ पै यांनी अत्यंत नम्रपणे पं. जवाहरलाल नेहरू यांना नकार दिला.


सिंधुदुर्गातील वेंगुर्ले येथे जन्मलेल्या बॅ. नाथ पै यांचं वास्तव्य हे बेळगावला गेले. मात्र बॅ. नाथ पै यांची नाळ कायमच कोकणशी जोडली गेलेली. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. बॅ. नाथ पै यांच्या निधनानंतर अहमदनगरच्या असलेल्या कै. प्रा. मधू दंडवते यांना बॅ. नाथ पै यांचे वारसदार म्हणून स्वीकारले आणि सलग पाच वेळा राजापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणूनही निवडून दिले. देशभरात काँग्रेसच्या विचारांची लाट असतानाही कोकणातून मात्र समाजवादी विचारांचाच पगडा राहिला. महाराष्ट्र विधानसभेत कोकणातून काँग्रेसचे उमेदवार निवडून जायचे; परंतु लोकसभेत मात्र कै. प्रा. मधू दंडवते या विचारवंतांना कोकणची जनता भरभरून मत देऊन निवडून द्यायची. यामागे कै. प्रा. मधू दंडवते यांची विद्वता, प्रामाणिकपणा, नि:स्वार्थीपणा, अर्थशास्त्रीय आधारित तत्त्वज्ञानाची केलेली मांडणी अशी अनेक कारणं होती. मात्र, त्यात बॅ. नाथ पै यांचा वारसदार हे एक प्रमुख कारण मात्र निश्चितपणे होतं. बॅ. नाथ पै यांचे विचारधन ज्यांना ऐकता आले, आनंद घेता आला ती पिढी भाग्यवानच म्हटली पाहिजे.


आजही बॅ. नाथ पै यांच्या आठवणीत रमणारे, नकळत डोळ्यांच्या कडा ओलावणारे अनेक सुरकुतलेले चेहरे पाहायला मिळतात. त्यांच्याकडून बॅ. नाथ पै यांच्या आठवणी ऐकता येतात. मंगळवारी २७ सप्टेंबर रोजी झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत जे अनेक महाराष्ट्र हिताचे निर्णय घेण्यात आले, त्यातीलच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी येथील विमानतळाला बॅ. नाथ पै यांचे नाव देण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाने घेतला आहे. चिपीचा परिसर हा वेंगुर्ले तालुक्यात येतो. बॅ. नाथ पै यांचे जन्मगाव वेंगुर्ले त्या अर्थानेही या नामकरणाला फार वेगळं भावनिक महत्त्व आहे. जनतेच्या भावना जोडलेल्या असलेल्या बॅ. नाथ पै यांचे नाव देऊन कोकण आणि बॅ. नाथ पै यांच्या नात्यालाही उजाळा दिला आहे.


चिपी येथील विमानतळाला बॅ. नाथ पै यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. आता विधिमंडळाचा ठराव करून तो केंद्राकडे पाठविल्यावर त्याच्यावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल. बॅ. नाथ पै यांच्या नामकरणाने कोकण सुखावले आहे.


तुझे हे थोरपण...आदर्श वक्ता, हे नाथ तुम्हा या भूमीचे खूप अपुलेपण!
किती थोरवी आज सांगू तयांची; गुणांचेच आम्हा आकर्षण !!
हिऱ्यासारखे तेज ज्याचे तयाला; विमानतळ हा करू अर्पण !!
- कवी सुरेश ठाकूर, आचरा

Comments
Add Comment