लखनऊ : समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात अखिलेश यादव यांची तिसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी राम गोपाल यादव यांनी त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. यावेळी पक्षश्रेष्ठींनी त्यांचे अभिनंदन करून पक्षासाठी लढत राहण्याची ग्वाही दिली.
अखिलेश यादव यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. सर्वप्रथम १ जानेवारी २०१४ रोजी त्यांना पहिल्यांदाच मुलायमसिंह यादव यांच्या जागी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आले होते. त्यानंतर ऑक्टोबर २०१७ मध्ये आग्रा येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांची पुन्हा एकदा पक्षाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली होती.
अखिलेश यादव यांच्या आधी त्यांचे वडील मुलायम सिंह यादव हे पक्षाच्या स्थापनेपासून अध्यक्ष होते. ऑक्टोबर १९९२ मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना झाली. तेव्हापासून आजतागायत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद यादव कुटुंबाकडेच आहे. अखिलेश यांच्या आधी मुलायमसिंह यादव पक्षाचे अध्यक्ष राहिले आहेत. याआधी बुधवारी सपाच्या प्रांतीय अधिवेशनात नरेश उत्तम पटेल यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.