धुबरी : आसामच्या धुबरी जिल्ह्यात ब्रह्मपुत्रा नदीत एक बोट बुडाली. या बोटीतील २९ पैकी १० जण बेपत्ता आहेत.
आसाम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सीईओ ज्ञानेंद्र देव त्रिपाठी यांनी अपघाताची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच, वरिष्ठ जिल्हा अधिकारी घटनास्थळी पोहोचले. ही अपघातग्रस्त बोट स्वदेशी बनावटीची यांत्रिक बोट आहे. याबाबतचा अधिक तपास आसाम आपत्ती व्यवस्थापन करत आहे.
या घटनेत धुबरीचे अधिकारीही अद्याप बेपत्ता असल्याचे उपायुक्त एम. पी. अनबामुथन यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, धुबरी जिल्ह्यातील भासानी नगर येथील ब्रह्मपुत्रा नदीत आज (गुरुवार) सकाळी हा अपघात झाला. या बोटीत धुबरीचे महसूल अधिकारी संजू दास यांच्यासह २९-३० हून अधिक लोक होते. बोट उलटल्याची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बोटीवरील सुमारे २० जणांपैकी १० जणांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र, महसूल अधिकारी संजू दास यांच्यासह १० जण अजूनही बेपत्ता आहेत. शोधमोहीम सुरू आहे. मात्र, अद्याप कोणाचाही पत्ता लागलेला नाही.